♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

“पुष्पा” स्टाईल तस्करीचा पर्दाफाश : मलकापूर पोलिसांनी १५ लाखांचे चंदन जप्त, बीड कनेक्शनची चौकशी

 

MH 28 News Live / मलकापूर : चंदन तस्करीवर आधारित गाजलेल्या “पुष्पा” चित्रपटातील घटना प्रत्यक्षात घडल्यासारखी चित्रपटासारखी शक्कल बुलढाणा जिल्ह्यातील तस्कराने लढविली. मलकापूर शहर पोलिसांनी आठ क्विंटल चंदनासह वाहन जप्त करून मोठ्या तस्करीचा पर्दाफाश केला. या प्रकरणात बीड जिल्ह्याशी असलेली लिंक तपासली जात असून, खरा “पुष्पा” कोण हे शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मलकापूर शहर पोलिसांनी बुलढाणा रोडवरील वानखेडे पेट्रोलपंपाजवळ संशयावरून मध्यप्रदेशच्या बुरहानपूरकडे जाणारे एक टाटा आयशर मालवाहू वाहन अडवले. पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता, वरून साधा माल ठेवण्यात आला होता. मात्र, पोलिसांच्या खात्रीलायक माहितीमुळे वाहनाची सखोल झडती घेतली असता, वाहनाच्या आत खास कप्पा तयार करून त्यात चंदनाचा मोठा साठा लपविलेला आढळून आला.

जप्त केलेल्या चंदनामध्ये ६ क्विंटल २९ किलो दीड फूट लांबीचे चंदन गाभे, २ क्विंटल चंदन गाभा व चुरा यांचा समावेश असून, एकूण किंमत सुमारे १५ लाख ३० हजार रुपये इतकी आहे. पोलिसांनी आयशरसह सुमारे २५ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या प्रकरणी वाहनचालक शेख जैनुद्दीन शेख अजीम (वय ४२, रा. नेकनूर, ता. जिल्हा बीड) याला अटक करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातील तस्कर राज्यभर चर्चेत असतानाच, या प्रकरणातही बीड कनेक्शन आहे का, याचा तपास सुरू आहे. तसेच या तस्करीमागचा खरा सूत्रधार कोण, याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. ही कारवाई मलकापूर पोलीस निरीक्षक गणेश गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. दरम्यान, जप्त केलेला चंदन साठा वनविभागाच्या ताब्यात देण्यात आला आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129