♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

सात लग्न, एक नवरी; प्रेमाच्या नावावर लाखोंचा खेळ !; सात जणांची टोळी गजाआड, दोघे निघाले बुलढाणा जिल्ह्यातले

MH 28 News Live : पुणे ग्रामीण परिसरात अविवाहित तरुणांना लग्नाचे स्वप्न दाखवून लाखोंची फसवणूक करणाऱ्या टोळीचा भांडाफोड झाला आहे. एकाच महिलेने सात वेगवेगळ्या तरुणांशी लग्नाचे नाटक करून त्यांच्याकडून पैसे उकळल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, सात जणांना अटक करण्यात आली आहे. यातील दोन आरोपी बुलढाणा जिल्ह्यातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

‘वधू’च निघाली फसवणूक मास्टरमाइंड

या टोळीची प्रमुख ‘वधू’ म्हणजे अश्विनी सागर जगदाळे. तिच्याविषयी पोलिसांनी धक्कादायक माहिती दिली की, तिला आधीच १६ वर्षांची मुलगी आणि १४ वर्षांचा मुलगा आहे. तरीसुद्धा तिने लग्न जुळविण्याच्या बहाण्याने सात तरुणांसोबत विवाह उरकला आणि त्यांच्या विश्वासाचा फायदा घेत लाखो रुपये उकळले.

आरोपींची यादी, बुलढाण्यातील दोघेही गजाआड

गुन्ह्यात अटक झालेल्यांमध्ये अश्विनीसह सुवर्णमाला सुरेश वाडकर (छत्रपती संभाजीनगर), मनीषा अडसुळे (सिंहगड रोड, पुणे), संतोष सखाराम घोडे (पिंपळनेर, देऊळगाव, बुलढाणा), भारती दामोदर मोरे (डोणगाव, मेहकर, बुलढाणा), सुनील काळे, पंकज डग (दोघेही पंचतळे, शिरूर) आणि नामदेव कोल्हे (जांबुत, पारनेर, अहिल्यानगर) यांचा समावेश आहे. या आरोपींना त्यांच्या मूळ गावी जाऊन अटक करण्यात आली आहे.

मध्यस्थी एजंटांनी लुटले प्रेमवीर

गुन्ह्यातील महिलांनी मध्यस्थी एजंट बनून तरुणांना ‘योग्य स्थळ’ मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी लाखो रुपये उकळत, खोट्या विवाह सोहळ्यांची नाटके रचली जात होती. या टोळीविरोधात ओतूर पोलीस स्टेशनमध्येही गुन्हा दाखल आहे.

जुन्नर, शिरूर, पारनेरमध्येही हाच धंदा

या टोळीने जुन्नर, पारनेर, शिरूर आदी भागातही अशाच प्रकारे अनेक तरुणांची आर्थिक व मानसिक फसवणूक केल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांनी आतापर्यंत २५ हजार रुपये रोख रक्कम जप्त केली आहे.

पुढील तपास वेगात

या प्रकरणातील चार आरोपी न्यायालयीन कोठडीत असून, तीन आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. एक आरोपी अद्याप फरार आहे. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, जुन्नर विभागाचे उपविभागीय अधिकारी रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली नारायणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक जगदेवाप्पा पाटील पुढील तपास करीत आहेत. प्रेमाच्या नावावर तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त करणारी ही ‘लग्नबाज टोळी’ सध्या पोलिसांच्या ताब्यात असली, तरी अनेकांच्या मनातील जखमा अजूनही ताज्या आहेत.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129