
डाक जीवन विमा योजनेसाठी थेट अभिकर्ता व क्षेत्र अधिकाऱ्यांची भरती; १२ ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन
MH 28 News Live / बुलडाणा : भारतीय डाक विभागाच्या डाक जीवन विमा योजनेअंतर्गत बुलडाणा जिल्ह्यात थेट अभिकर्ता आणि क्षेत्र अधिकारी पदांसाठी भरती प्रक्रियेस प्रारंभ झाला आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले असून, १२ ऑगस्ट २०२५ रोजी आवश्यक कागदपत्रांसह प्रत्यक्ष उपस्थित राहावे, असे आवाहन डाकघर अधीक्षक गणेश आंभोरे यांनी केले आहे.

उमेदवारांनी अर्जाचा नमुना बुलडाणा प्रधान डाकघर किंवा डाक अधीक्षक, बुलडाणा कार्यालयातून प्राप्त करावा. ही संधी विशेषतः स्थानिक युवक-युवतींसाठी रोजगाराची नवी दिशा देणारी आहे. डाक जीवन विमा योजनेंतर्गत थेट अभिकर्ता व क्षेत्र अधिकारी म्हणून काम करताना उमेदवारांना व्यावसायिक सक्षमता व सामाजिक प्रतिष्ठा मिळविण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
अर्ज सादर करताना शैक्षणिक पात्रता, ओळखपत्र, राहत्या पत्त्याचा पुरावा आणि इतर आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे बंधनकारक आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी स्थानिक डाक कार्यालयाशी संपर्क साधावा.

या संधीचा लाभ घेऊन डाक विभागाचा विश्वासार्ह भाग व्हा आणि आपल्या कार्यातून समाजात सकारात्मक बदल घडवा, असे आवाहनही अधीक्षकांनी केले आहे.



