
“स्पेशल २६ ” चा जळगाव जामोद अवतार… तोतया पोलीसांनी टाकला ढाब्यावर छापा, अखेर तिघे बदमाश गजाआड !
MH 28 News Live / जळगाव जामोद : तोतायागिरी म्हणजे काय, याचे किस्से भारतात कमी नाहीत. कुणी तोतया अधिकारी बनतो, कुणी रेल्वेत टीसीचा गणवेष घालून डाव मांडतो. बिहारमध्ये तर चक्क बनावट पोलिस स्टेशन सुरू झाले होते, तर केरळमध्ये ‘बँक’च बनावट निघाली! हिंदीत गाजलेला ‘स्पेशल २६’ चित्रपट हेच सांगतो की, या तोतायागिरीला कल्पनांची मर्यादा नसते. अशाच ‘स्पेशल २६’ स्टाइलचा थरार जळगाव जामोद तालुक्यात नुकताच प्रत्यक्ष घडला आणि ढाब्यावर छापेमारी करत खऱ्या पोलिसांची भूमिका करणारे तिघे शेवटी स्वतः गजाआड गेले.
ढाब्यावर ड्युप्लिकेट पोलिसांची ‘स्पेशल धाड’
११ आणि १३ जुलै रोजी जळगाव जामोद तालुक्यातील मानेगाव फाट्यावर ‘माँ पूर्णा माई’ ढाब्यावर एक अनोखी ‘पोलिसी धाड’ पडली. तीन जण तिथं पोहोचले आणि स्वतःला विशेष पथकाचे पोलिस असल्याचे सांगितले. ‘‘ढाब्यावर अवैध दारू विकली जाते,’’ असा ठरलेला डायलॉग फेकत त्यांनी झडतीही सुरू केली.
तोतया पोलिसांची हुशारी, पण…
झडती दरम्यान हे तिघे इतक्या आत्मविश्वासाने वावरत होते की, प्रत्यक्ष पोलिसही काही काळ फसू शकले असते! मात्र ढाबाचालक सुनील इंदोरे यांना या पोलिसगिरीत काही तरी गडबड वाटली. चहापाण्याचे बिल घेण्याऐवजी हे थेट पावतीपुस्तक काढतील की काय, अशी शंका त्यांना आली आणि त्यांनी लगेच पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी चौकशी केली असता, अजयसिंग राजपूत (रा. शेगाव), अक्षय राजपूत आणि सचिन कंठाळे (रा. जलंब) या तिघांचं पोलिसगिरीशी दुरान्वयानेही काही संबंध नाही, हे स्पष्ट झालं. अखेर त्यांच्याविरुद्ध जळगाव जामोद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसी वर्दी नसेल, तरी पोलिसांचा धाक दाखवून लोकांना गंडवण्याचा त्यांचा प्लॅन पोलिसांनीच उद्ध्वस्त केला.
जिल्ह्यात खळबळ, तोतायागिरीचा धडा
ढाब्यावर झालेल्या या ‘स्पेशल’ धाडीतून जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडाली आहे. ‘स्पेशल २६’मधल्या अजय सिंगचा अवतार घ्यायचा मोह या तिघांना पडला खरा, पण खाकीवाल्यांनी दाखवून दिलं की, खऱ्या पोलिसांपासून तोतया पोलिस लपून राहत नाहीत. तोतायागिरी कितीही फिल्मी पद्धतीने केली, तरी पोलिसांच्या जाळ्यातून सुटका नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.