
पुरवठा अधिकारी टेकाळे २५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अडकले
MH 28 News Live / बुलढाणा : हमीभावाने ज्वारी विकलेल्या शेतकऱ्याचे थकीत देयक लवकर मिळावे, यासाठी २५ हजारांची लाच घेताना जिल्हा पुरवठा अधिकारी गजानन नंदकिशोर टेकाळे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई बुधवारी (२३ जुलै) दुपारी पुरवठा अधिकारी कार्यालयात करण्यात आली.
ही घटना उघडकीस आल्यानंतर महसूल खात्यात एकच खळबळ उडाली असून, आरोपी टेकाळे याच्यासह त्याचा हस्तक व कार्यालयातील निवृत्त कर्मचारी देवानंद खंडागळे यालाही अटक करण्यात आली आहे.
एसीबीकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाणा तालुक्यातील धाड परिसरातील एका शेतकऱ्याने शासनाच्या हमीभाव योजनेंतर्गत ज्वारी विकली होती. मात्र विक्रीचे पैसे मिळण्यात विलंब होत होता. या देयकासाठी लवकर मंजुरी देण्यासाठी टेकाळे याने खंडागळे यांच्या मार्फत शेतकऱ्याकडे ७० हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीनंतर रक्कम ५० हजार ठरवली गेली आणि ती दोन टप्प्यांत देण्याचे ठरले.
या प्रकरणी शेतकऱ्याने एसीबीकडे तक्रार केल्यानंतर खातरजमा करून पथकाने सापळा रचला. ठरल्याप्रमाणे २५ हजार रुपयांची पहिली रक्कम स्वीकारताना टेकाळे याला अटक करण्यात आली. त्याचवेळी खंडागळे यालाही ताब्यात घेण्यात आले.
या दोघांविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, एसीबीचे पोलीस निरीक्षक रमेश पवार, विलास गुंसिफे, एपीआय शाम भांगे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई पार पडली.