
शिक्षण संस्थेतील लाचखोरीचा भांडाफोड; महिला कर्मचाऱ्याच्या निवृत्तीवेतनासाठी २ लाखांची मागणी, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून चोप
MH 28 News Live / खामगाव : शहरातील नॅशनल एज्युकेशन सोसायटी महिला कॉलेजमध्ये निवृत्त झालेल्या महिला कर्मचाऱ्यांकडून निवृत्तीवेतन काढून देण्याच्या नावाखाली दोन लाख रुपये उकळल्याचा प्रकार उघड झाला आहे. संबंधित महिला शिवसेना महिला आघाडीच्या शहरप्रमुख यांच्या आई असून, निवृत्तीनंतर मिळणाऱ्या हक्काच्या पैशासाठी वारंवार चकरा माराव्या लागत होत्या.
या प्रकरणात कॉलेजमधील कर्मचारी जयेश चंद्रकांत नागडा यांनी आतापर्यंत सुमारे दोन लाख रुपये घेतले असून, अजून २५ ते ३० हजारांची मागणी केल्याची माहिती समोर आली आहे. या मागणीला कंटाळून संबंधित महिलेला अक्षरशः कॉलेजच्या आवारातून बाहेर काढण्यात आले. ही माहिती शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र बघे आणि शहरप्रमुख चेतन ठोंबरे यांच्यापर्यंत पोहोचताच, त्यांनी तत्काळ कॉलेज गाठले. यानंतर त्यांनी ‘शिवसेना स्टाईल’मध्ये नागडा याला जाब विचारून चोप दिल्याचे सांगण्यात येते.
या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून, शिक्षण संस्थेमध्ये अशा प्रकारचे लाचखोरीचे प्रकार उघडकीस येणे ही चिंतेची बाब मानली जात आहे. संबंधित घटनेची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.