
झोपेत मृत्यूचे विष; कोब्रा चावल्याने महिलेचा दुर्दैवी अंत; लोणार तालुक्यातील घटना
MH 28 News Live / लोणार : तालुक्यातील पहुर गावात गुरुवारी रात्री एक हृदयद्रावक घटना घडली. झोपेत असताना अंथरुणात शिरलेल्या कोब्रा जातीच्या विषारी सापाने दंश केल्याने सिंधुताई शंकर मुंडे (वय अंदाजे ५५) या महिलेला आपला जीव गमवावा लागला. या घटनेने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पावसाळ्यातील सर्पदंशाच्या घटनांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

सिंधुताई आपल्या घरात रात्री पांघरुण घेऊन झोपल्या होत्या. पावसामुळे घराच्या आजूबाजूचा परिसर ओलसर व थंड झालेला असतानाच एका कोब्रा सापाने त्यांच्या अंथरुणात शिरकाव केला. झोपेतच सर्पदंश झाल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी त्यांना तातडीने मेहकर येथील रुग्णालयात हलवले. मात्र रस्ते बंद, पूरस्थिती आणि उशीर झाल्यामुळे त्यांना वेळेवर उपचार मिळाले नाहीत. अखेर वाटेतच त्यांचा तडफडून मृत्यू झाला.
या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे. पावसाळ्यामुळे सापांचे बिळे पाण्याखाली जात असल्याने सापांचा मानवी वस्तीतील प्रवेश वाढला आहे. विशेषतः ग्रामीण भागात अशा घटनांचे प्रमाण वाढले असून, नागरिकांनी घरांचे दरवाजे बंद ठेवणे, खालच्या भागातील फटी बुजवणे, पांघरुण वापरताना दक्षता घेणे, घरासभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवणे आदी उपाययोजना करणे गरजेचे आहे.

सिंधुताई मुंडे यांचा मृत्यू केवळ एक वैयक्तिक शोकांतिका न राहता, संपूर्ण समाजाला सतर्क राहण्याचा इशारा देणारी घटना ठरत आहे. प्रशासनानेही अशा घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जनजागृती, वैद्यकीय सुविधा उपलब्धता आणि आपत्ती काळातील रस्ते दुरुस्ती या बाबतीत अधिक तत्पर राहणे गरजेचे आहे.



