♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

चिखलीत “देवाभाऊ लाडकी बहीण पतसंस्थेची” स्थापना — महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण पाऊल

MH 28 News Live / चिखली : जिल्ह्यातील महिलांसाठी एक आनंददायी आणि परिवर्तनशील बातमी समोर आली आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थी महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी “देवाभाऊ लाडकी बहीण नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, चिखली” या नव्या सहकारी संस्थेची अधिकृत स्थापना करण्यात आली आहे. या संस्थेचे उद्घाटन चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आणि समाजसेविका श्वेता महाले पाटील यांच्या पुढाकाराने झाले.

फक्त ‘लाडकी बहिणी’ंसाठीच सभासदत्व

या पतसंस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे, ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या’ लाभार्थी महिलांनाच यामध्ये सभासद होण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे ही संस्था केवळ स्त्रियांसाठी, आणि विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी कार्य करणार आहे. यामुळे महिलांना बचत, गुंतवणूक व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असे प्रतिपादन आमदार श्वेता महाले यांनी केले.

सरकारच्या धोरणांना हातभार

या उपक्रमाद्वारे महिलांना बँकिंग व आर्थिक व्यवस्थापनाच्या प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभाग घेता येणार असून, स्त्री-पुरुष आर्थिक विषमतेच्या निराकरणासाठी हे एक सुंदर पाऊल असल्याचे आ. महाले यांनी नमूद केले. यामार्फत गावोगावातील बचत गटातील महिलाही एकत्र येऊन सक्षम होतील. पतसंस्थेची नोंदणी शासकीय परिपत्रकानुसार करण्यात येत आहे.

सदस्य होण्यासाठी आवश्यक बाबी
या पतसंस्थेत सभासद होण्यासाठी:

वय: २१ ते ६५ वर्षे.

कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न : २.५ लाख रुपयांपेक्षा कमी असावे.

बँक खात्याशी आधार लिंक आवश्यक.

सभासद फी : १००० रुपये.

आवश्यक कागदपत्रे : आधार कार्ड झेरॉक्स, पासपोर्ट साईज फोटो आणि भरलेला अर्ज.

महिलांसाठी समर्पित आर्थिक व्यवस्था

आज महाराष्ट्रात हजारो सहकारी पतसंस्था कार्यरत असताना, फक्त महिलांसाठी आणि त्याही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील महिलांसाठी सुरू होणारी ही पतसंस्था एक प्रेरणादायी उदाहरण ठरणार आहे. सामाजिक व आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करणाऱ्या महिलांसाठी ही संस्था एक ठोस आधार ठरेल, असा विश्वास आ. श्वेताताई महाले यांनी व्यक्त केला. या नव्या उपक्रमामुळे बुलढाणा जिल्ह्यातील असंख्य ‘लाडक्या बहिणींच्या’ आयुष्याला आर्थिक बळ मिळून, स्वावलंबनाची नवी दिशा मिळेल, हे निश्चित !

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129