
लाखो भक्तांच्या सेवेसाठी लासुरा फाट्यावर विशेष वैद्यकीय मदत केंद्र केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या पुढाकारातून उपयुक्त उपक्रम
MH 28 News Live / खामगाव : संत गजानन महाराजांच्या पालखीला शेगावकडे प्रस्थान करण्याचा अंतिम टप्पा ३१ जुलै रोजी पार पडणार असून, या पायी यात्रेमध्ये सहभागी होणाऱ्या लाखो भक्तांसाठी आरोग्य सुविधा आणि आपत्कालीन मदतीसाठी लासुरा फाट्यावर विशेष वैद्यकीय मदत कक्ष उभारण्यात येत आहे. ही सेवा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या संकल्पनेतून राबवली जात असून, भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरणार आहे.
यात्रेचा अंतिम टप्पा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. संत गजानन महाराजांची पालखी पंढरपूरहून परतीच्या मार्गावर असून, ३० जुलै रोजी खामगाव येथे तिचा शेवटचा मुक्काम असणार आहे. त्यानंतर ३१ जुलै रोजी सकाळी लाखो भाविकांचा जत्था १८ किलोमीटरचा खामगाव ते शेगाव हा पायी प्रवास करत महाराजांच्या समाधीस्थळी दाखल होणार आहे.
या प्रवासात वृद्ध, महिला, लहान मुले आणि विविध भागातून आलेले भक्त सहभागी होतात. त्यामुळे लासुरा फाट्यावरील वैद्यकीय मदत केंद्रातून ताप, डिहायड्रेशन, थकवा, इतर आपत्कालीन आरोग्य समस्या हाताळण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर, औषधे, अॅम्ब्युलन्स आणि विश्रांतीची सोय पुरवली जाणार आहे. तसेच सेवाभावी संस्थांच्या मदतीने या केंद्रात भक्तांना पिण्याचे पाणी, अल्पोपहार आणि आवश्यक मदतही पुरवली जाणार आहे.
या सेवेमुळे भाविकांना नुसती आरोग्यदृष्ट्या मदतच मिळणार नाही, तर शेगावच्या दिशेने निघालेला त्यांचा भक्तिपूर्वक प्रवास अधिक सुरक्षित आणि सुलभ ठरणार आहे. लाखो भक्तांच्या सेवेसाठी उभारलेली ही यंत्रणा त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रभावी ठरण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.