
ग्रामीण भागात रोजगाराची नवी संधी; इतरांचे वीज बिल भरा आणि पैसे कमवा… महावितरणची नवी योजना
MH 28 News Live / बुलढाणा : महावितरणने स्वतःचे डिजिटल पेमेंट वॉलेट सुरू करून वीज ग्राहकांसाठी एक नवे आर्थिक साधन उपलब्ध करून दिले आहे. या वॉलेटच्या माध्यमातून वीजबिल भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ झाल्याने ग्राहकांना तसेच ग्रामीण भागातील युवकांना आणि लघुउद्योजकांना नवे उत्पन्नाचे स्रोत उपलब्ध झाले आहेत.
या वॉलेटद्वारे ग्राहक पाच हजार रुपयांपासून एक लाख रुपयांपर्यंतचे वीजबिल सहजपणे भरू शकतात. विशेष बाब म्हणजे, दर वीजबिल भरण्यानंतर वॉलेट धारकाला थेट पाच रुपये कमिशन मिळते. त्यामुळे दुकानदार, मोबाइल शॉप चालक तसेच ग्रामीण भागातील युवक यांच्यासाठी हे वॉलेट एक व्यवसायिक संधी ठरत आहे.
वॉलेट मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवारांना काही कागदपत्रांची आवश्यकता भासते. यात आधारकार्ड, पॅनकार्ड, पत्त्याचा पुरावा, पासपोर्ट साईज फोटो, रद्द केलेला धनादेश, भाडेकरार अथवा मालकीचे वीजबिल इत्यादींचा समावेश आहे. अर्ज सादर केल्यानंतर महावितरणकडून संबंधित स्थळाची प्रत्यक्ष पाहणी केली जाते. त्यानंतर अर्ज मंजूर करून वॉलेटची मान्यता दिली जाते.
या उपक्रमामुळे महावितरणने एकीकडे डिजिटल व्यवहारांना चालना दिली असून दुसरीकडे ग्रामीण व उपनगरांतील छोट्या व्यावसायिकांना उत्पन्नाचे साधन निर्माण करून दिले आहे. भविष्यात ही सेवा अधिक व्यापक होऊन अनेक युवकांना आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करण्यास हातभार लावेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.