♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

जिल्ह्यात लम्पीचा कहर : ३४० गुरांना लागण, ५ मृत्युमुखी

MH 28 News Live / बुलढाणा : (प्रतिनिधी) : जिल्ह्यात गुरांमध्ये लम्पी त्वचा रोगाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून पशुपालकांसाठी ही चिंतेची बाब ठरत आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील तब्बल ६२ गावांमध्ये ३४० गुरांना या संसर्गजन्य आजाराची लागण झाल्याची अधिकृत नोंद पशुसंवर्धन विभागाने घेतली आहे.

या बाधित गुरांपैकी १३६ गुरांनी उपचारांनंतर रोगमुक्ती मिळवली असली तरी, १९९ गुरांवर अजूनही उपचार सुरू आहेत. दुर्दैवाने या रोगामुळे आतापर्यंत ५ गुरांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

पावसाळ्याच्या दिवसांत लम्पीचा संसर्ग अधिक गतीने वाढत असल्याने पशुपालकांमध्ये मोठ्या प्रमाणावर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यात या आजाराचा प्रसार झपाट्याने होत असल्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे निरीक्षण आहे.

पशुसंवर्धन विभागाने रोगग्रस्त भागांत प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली असून, लसीकरण, औषधोपचार आणि जनजागृती मोहिमा हाती घेण्यात येत आहेत. पशुपालकांनी गुरांच्या आरोग्याकडे अधिक लक्ष देणे आणि कोणतेही लक्षण दिसताच त्वरित पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील शेतीवर आणि दुग्धव्यवसायावर अवलंबून असलेल्या कुटुंबांसाठी हा रोग गंभीर आर्थिक नुकसान करणारा ठरू शकतो, अशी चिंता स्थानिक पातळीवर व्यक्त केली जात आहे. प्रशासनाकडून लवकरात लवकर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129