
आई-वडिलांच्या मृत्यूनं दोन भावंडं पोरकी : चिखली तालुक्यातील नाडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर
MH 28 News Live / चिखली : “सुखी संसाराचं उदाहरण” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका दांपत्याच्या कुटुंबावर अवघ्या २० दिवसांत दुःखाचा डोंगर कोसळला. चिखली तालुक्यातील इसरूळ येथील रमेश उत्तम नाडे (वय ३८) व त्यांच्या पत्नी आशाबाई रमेश नाडे (वय ३३) या दाम्पत्याच्या अकाली निधनाने दोन चिमुकले सागर (वय १३) आणि सचिन (वय ११) हे भावंडं पूर्णतः पोरकी झाली आहेत. ही हृदयद्रावक घटना संपूर्ण गावाला पिळवटून गेली असून, प्रत्येक घरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
नाडे दांपत्य मजुरी करून आपल्या संसाराचा गाडा नेटाने ओढत होते. त्यांची दोन मुलं – सागर आणि सचिन शिक्षण घेत होते. गरिबी असूनही कुटुंब एकसंघ, आनंदी आणि गुणी समजलं जात होतं. मात्र मागील सहा महिन्यांपासून आशाबाई आजारी होत्या. विविध रुग्णालयांत उपचार करूनही त्यांची प्रकृती सुधारली नाही. अखेर ११ जुलै रोजी त्यांचे दुःखद निधन झाले. पत्नीच्या जाण्याचे दुःख रमेश नाडे यांना सहन झालं नाही. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, या आघातानंतर ते मानसिकदृष्ट्या खचले आणि व्यसनाकडे वळल्याचं बोललं जात आहे.
त्यांचीही प्रकृती दिवसेंदिवस खालावत गेली. पुण्यात उपचारासाठी नेण्यात आलं, मात्र १ ऑगस्ट रोजी त्यांचाही मृत्यू झाला. अवघ्या २० दिवसांच्या अंतराने दोघांचं निधन झाल्याने हे कुटुंब अक्षरशः उध्वस्त झालं. आता सागर आणि सचिन या दोन लहानग्यांवर कुणी माया करणार, याची चिंता संपूर्ण गावाला भेडसावत आहे.
या संपूर्ण घटनेमुळे इसरूळ गावावर शोककळा पसरली असून, दोन्ही मुलांचं भविष्य अंधारात गेल्याची भावना व्यक्त होत आहे. गावकऱ्यांनी प्रशासनाने या दोन्ही भावंडांना योग्य आश्रय, शिक्षण आणि पुनर्वसनाची मदत करावी, अशी मागणी केली आहे. नाडे कुटुंबाच्या दुर्दैवी आणि वेदनादायी अंताने एक सामाजिक प्रश्नही पुढे आला आहे – अशा पोरक्या झालेल्या मुलांसाठी कोणती यंत्रणा तत्काळ पुढे येणार? गावकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू असून, काळीज सुन्न करणारी ही घटना समाजाला हादरवून गेली आहे.