♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

” धरण उशाला, कोरड घशाला… ‘पावसाळा मुसळधार, तरीही सावरखेडला पाण्यासाठी भटकंती

MH 28 News Live / चिखली : तालुक्यातील सावरखेड गावात सध्या जलसंकटाने भीषण स्वरूप धारण केले असून, गावकऱ्यांना भर पावसाळ्यातही पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. दोन महिने उलटून पावसाळा सुरू असूनही गावात अद्यापही पाणीटंचाई कायम आहे. “धरण उशाला आणि कोरड घशाला” अशी व्यथा गावातील महिलांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येते.

जिल्ह्यात मागील दोन महिन्यांत चांगला पाऊस झाला असून, काही धरणे आणि तलाव भरले आहेत. त्यातच पेन टाकळी धरण तर भरून वाहू लागले आहे. मात्र हे धरण अगदी जवळ असूनही त्याचा पाणीपुरवठा सावरखेडला होत नसल्याने ग्रामस्थ संतप्त आहेत.

गेल्या सहा महिन्यांपासून गावाला नियमित पाणीपुरवठा केला जात नसल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. काहींनी घरपट्टी कर न भरल्याच्या कारणावरून ग्रामपंचायतीने पाणीपुरवठा बंद केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. पाणीपट्टी मात्र अनेकांनी भरलेली असून, या वादातून संपूर्ण गावाचाच पाणीपुरवठा थांबवण्यात आल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

सुमारे एक हजार लोकवस्ती असलेल्या या गावातील एकमेव हातपंप नादुरुस्त असून, त्यातून पाणी येत नाही. त्यामुळे महिलांना लांबवरून पाणी आणावे लागत असून, त्यांचे हाल अधिकच वाढले आहेत. दररोजच्या या हालांमुळे ग्रामस्थांनी सरपंच व ग्रामसेवकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

या पार्श्वभूमीवर सावरखेड ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तातडीने हस्तक्षेप करून नियमित पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी केली आहे. भर पावसाळ्यात अशी स्थिती राहणे ही प्रशासनासाठीही विचार करण्यासारखी बाब ठरत आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129