♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

अशी ही फसवा फसवी… विवाहित महिलेसोबत लावून दिले अविवाहित तरुणाचे लग्न, पोलिसांनी केली चौघांना अटक

MH 28 News Live / धाड : अविवाहित तरुणांचे लग्न लावून त्यांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा धक्कादायक प्रकार धाड येथे उघडकीस आला आहे. कोमल पाटील या विवाहित महिलेसोबत अविवाहित युवकाचे बनावट कागदपत्रांवर लग्न लावून घेतल्याप्रकरणी धाड पोलिसांनी चार जणांना अटक केली असून, दोघे आरोपी अद्याप फरार आहेत. ही कारवाई पीडित युवक वैभव विठ्ठल माळोदे (वय २८, रा. धाड) यांच्या तक्रारीवरून करण्यात आली आहे.

वैभव यांना मुलगी असल्याचे सांगून काही व्यक्तींनी त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पैसे व दागिने उकळले. त्यानंतर कोमल दिलीप पाटील (रा. इंदिरानगर, शेगाव) या आधीच विवाहित महिलेशी त्याचे लग्न लावण्यात आले. हे लग्न केवळ बनावट कागदपत्रांच्या आधारे लावण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे वैभवला मानसिक धक्का बसला असून, नातेवाईक व गावकऱ्यांत त्याची थट्टा होत आहे.

या प्रकरणी कोमल पाटील, योगेश माधव थोरात, प्रतिभा ऊर्फ हिरा गांगुर्डे (रा. पेंढुर्ली, ता. सिन्नर, जि. नाशिक) आणि साक्षी गणेश कालाप या चौघांना अटक करण्यात आली आहे. तर नितीन भरत जमधाडे (रा. नाशिक) आणि अक्षय देवराज गजभरे (रा. पुसद, जि. यवतमाळ) हे दोघे सध्या फरार असून, त्यांचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.

अटक केलेल्या चौघांना बुलढाणा येथील विशेष जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असता, ८ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

तपासादरम्यान या टोळीने यापूर्वी अशा प्रकारे अनेक लग्ने लावल्याचा व तरुणांची फसवणूक केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, या चौघांकडून अधिक माहिती उघड होण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा तपास ठाणेदार अशिष चेचरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर केंद्रे व त्यांच्या पथकाकडून सुरू आहे.

लग्नाच्या नावाखाली फसवणूक करणारी ही टोळी केवळ जिल्ह्यातच नव्हे, तर संपूर्ण राज्यात सक्रिय असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत असून, अशा प्रकारांच्या इतर घटना उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या घटनेच्या पुढील तपासाकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129