
डोंगरशेवलीला मंदिरात अस्वलांचा ‘मुक्त संचार’, शेतकरी व मजुरांमध्ये भीतीचे सावट
MH 28 News Live / बुलढाणा : जिल्ह्यातील डोंगरशेवली गावाजवळील श्री दशरथेश्वर महादेव मंदिर परिसरात दोन अस्वलांचा वावर आढळून आल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, ही अस्वले थेट मंदिरात दिसल्याने श्रद्धाळूंसह शेतकरी व मजूर वर्गात चिंतेचे सावट पसरले आहे.

सध्या खरीप हंगामातील शेतीकामांना वेग आला असताना, मजूर मोठ्या प्रमाणात शेतात कामासाठी जात आहेत. मात्र, जंगलातून भटकून मंदिर परिसरात आलेल्या या दोन अस्वलांच्या उपस्थितीने त्यांची पावले थांबली आहेत. सकाळ-संध्याकाळ मंदिरात पूजा-अर्चनासाठी येणारे भाविकही आता सावध झाले आहेत.
वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली असून, ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. “शेतात किंवा जंगलाच्या परिसरात एकटे जाणे टाळावे, गटानेच जावे, तसेच अस्वल दिसल्यास त्याला चिथावू नये,” असे निर्देश वन अधिकाऱ्यांनी दिले आहेत.

दरम्यान, स्थानिक ग्रामस्थांनी वन विभागाकडे तातडीने या अस्वलांना सुरक्षितरीत्या पकडून जंगलात परत पाठविण्याची मागणी केली आहे. भीतीचे वातावरण असूनही, सर्वजण सावधगिरी बाळगून परिस्थिती नियंत्रणात राहावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



