
नक्षलग्रस्त भागातील उल्लेखनीय सेवेसाठी बुलढाण्यातील चार पोलिस कर्मचाऱ्यांना विशेष सेवा पदक
MH 28 News Live / चिखली : नक्षलग्रस्त गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यात धाडसी व उल्लेखनीय सेवा बजावणाऱ्या, तसेच सध्या बुलढाणा जिल्ह्यात कार्यरत असलेल्या चार पोलिस कर्मचाऱ्यांना ‘विशेष सेवा पदक’ जाहीर करण्यात आले आहे. यात एका अधिकाऱ्यासह तीन पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश असून, एक महिला पोलीस कर्मचारीदेखील या मानाच्या पदकाची मानकरी ठरली आहे.
बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत पोलीस उपनिरीक्षक प्रताप बाजड यांनी २००१ ते २००४ दरम्यान गडचिरोलीतील केशोरी पोलीस ठाणे गोठणगाव चौकीत सेवा दिली. या काळात त्यांनी नक्षलविरोधी अभियान राबवून शांतता प्रस्थापित केली. विशेष म्हणजे, ७९ विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी स्वयंस्फूर्त मदत करून त्यांना शासकीय सेवेत दाखल होण्यास हातभार लावला. ‘गाव तिथे ग्रंथालय’ उपक्रमातून स्थानिकांमध्ये पोलिस दलाविषयी विश्वास निर्माण करण्यातही त्यांनी मोलाची भूमिका बजावली.
त्यांच्यासह रामेश्वर आंधळे, पंचगंगा भोजणे व सुपाजी तायडे यांनाही विशेष सेवा पदकाची घोषणा झाली आहे. या तिघांनी ‘कम्युनिटी पोलिसिंग’च्या माध्यमातून शासनाच्या योजनांचा लाभ सामान्य जनतेपर्यंत पोहोचवला, तसेच गोपनीय माहिती पुरवून नक्षली कारवायांना आळा घालण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले.
किसन आंधळे यांनी पोलीस मदत केंद्र हेड्री व सी-६० प्राणहिता येथे दोन वर्षे सेवा बजावली असून ते सध्या बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. सुपाजी तायडे यांनी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात काम करताना गुप्तहेर शाखेत उल्लेखनीय कामगिरी केली. तर गडचिरोली जिल्ह्यात कल्याण शाखा व निवडणूक शाखेत महिला चालक म्हणून कार्यरत राहिलेल्या पंचगंगा भोजणे सध्या खामगाव येथे कार्यरत आहेत. या चौघांच्या यशाबद्दल पोलीस अधीक्षक नीलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, अमोल गायकवाड, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक सुनील अंबुलकर व उपअधीक्षक बाळकृष्ण पावरा यांनी त्यांचे अभिनंदन केले.



