
मामुलवाडीच्या जिगाव प्रकल्पग्रस्तांचा आक्रोश, पालकमंत्र्यांकडे धाव
MH 28 News Live / नांदुरा : “आमची शेती पाण्याखाली गेली, घरं उद्ध्वस्त होणार आहेत, मोबदल्याची वाट पाहता पाहता संसार उद्ध्वस्त होत आहे…” अशा आक्रोशासह मामुलवाडी गावातील जिगाव प्रकल्पग्रस्त शेतकरी व ग्रामस्थांनी १५ ऑगस्ट रोजी बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांची भेट घेतली.

गावकऱ्यांनी सांगितले की, अनेक वर्षांपासून पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित आहे. आतापर्यंत दोनदा सहा-सहा महिन्यांच्या मुदतवाढ मिळाल्यानंतर पुन्हा फक्त तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. या दरम्यान मोबदला न मिळाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. “शेतात कष्ट करूनही आम्हाला काय मिळणार? उद्याचा दिवस कसा काढायचा, याचाच प्रश्न आहे,” असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.

या परिस्थितीत शासनाने व प्रशासनाने तातडीने पुढे येऊन प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवावेत, योग्य मोबदला देऊन न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली. गावकऱ्यांचा आक्रोश ऐकून पालकमंत्री मकरंद पाटील यांनी “तुमच्या वेदना मी समजतो, या समस्या मंत्रालयात नेऊन तातडीने मार्गी लावण्याचा प्रयत्न करीन,” असे आश्वासन दिले. मामुलवाडीतील समस्त ग्रामस्थ या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि त्यांनी न्याय मिळेपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.



