
पत्रकारितेतील योगदानाबद्दल रेणुकादास मुळे महाराष्ट्र कीर्ती पुरस्काराने सन्मानित’
MH 28 News Live / चिखली : पत्रकारितेच्या क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण करणारे दैनिक समाज नायकचे मुख्य संपादक तथा MH 28 News Live चे एडिटर – इन – चीफ रेणुकादास मुळे यांना आनंदी युनिव्हर्स फाउंडेशन, पुणे तर्फे ‘महाराष्ट्र कीर्ती पुरस्कार २०२५’ प्रदान करण्यात आला. हा सन्मान २१ ऑगस्ट रोजी पुणे येथील पंडित नेहरू सभागृहात झालेल्या भव्य समारंभात देण्यात आला.
कार्यक्रमात सिने अभिनेत्री हर्षिता ठाकूर आणि सुप्रसिद्ध मॉडेल व अभिनेत्री स्नेहा भालेराव यांच्या हस्ते रेणुकादास मुळे यांना मानपत्र, स्मृतिचिन्ह व पदक देऊन गौरवण्यात आले. यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष गणेश विटकर, डॉ. रवी अग्रवाल तसेच पोलीस उपनिरीक्षक मनीषा जाधव हे मान्यवर उपस्थित होते. समारंभाचे सूत्रसंचालन प्रमोद कुळकर्णी आणि मेबल आलट यांनी केले.
सदर कार्यक्रमात महाराष्ट्रातील सामाजिक कार्य, पत्रकारिता, कला, साहित्य, उद्योग, क्रीडा, शिक्षण व कृषी अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना सन्मानचिन्हे प्रदान करण्यात आली. या उपलब्धीबद्दल रेणुकादास मुळे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.