
लाडकी योजनेत घोटाळा; १९९ महिला कर्मचाऱ्यांसह पुरुषांचाही सहभाग, लाखो रुपये लाटले
MH 28 News Live / बुलढाणा : राज्य सरकारची लाडकी बहीण योजना ही महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आली असली तरी आता या योजनेतून मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. जिल्हा परिषदेतील सरकारी कर्मचारीच नियम धाब्यावर बसवून लाभ घेत असल्याचे समोर आले आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील प्रकरण
बुलढाणा जिल्हा परिषदेतील तब्बल १९९ महिला कर्मचारी अपात्र ठरूनही महिन्याला १५०० रुपये घेत असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणामुळे जिल्हा परिषदेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. लवकरच या सर्व महिलांवर कारवाई केली जाणार असून बेकायदेशीर रक्कम वसूल करण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी आशिष पवार यांनी दिली आहे.

नाशिक जिल्ह्यातील प्रकार
नाशिक जिल्हा परिषदेतही हा घोटाळा उघडकीस आला आहे. येथे तब्बल ८ कर्मचाऱ्यांनी या योजनेचा गैरवापर करून लाभ घेतला असून त्यामध्ये दोन पुरुष कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. यामुळे प्रशासनात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या बोगस लाभार्थ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होणार असून त्यांच्याकडून शासकीय निधी वसूल केला जाणार आहे.
राज्यभरातील मोठे चित्र
लाडकी बहीण योजनेत गैरवापराची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही राज्यभरातील सुमारे ११८१ महिला कर्मचारी अपात्र ठरल्या असून, त्यांच्यावरील कारवाईसाठी महिला व बालविकास विभागाने आदेश दिले आहेत. नियमबाह्यरित्या घेतलेले लाभ आता बंद होणार असून संबंधित कर्मचाऱ्यांना जबाबदार धरले जाणार आहे.

महिलांच्या सक्षमीकरणासाठी असलेल्या या योजनेतून शासकीय कर्मचारीच लाखो रुपयांचा गैरवापर करत असल्याचे समोर आल्यानंतर प्रशासनासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. दोषींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.



