♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

राजू शेट्टींचा सरकारला इशारा : पुरग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने सरसकट मदत द्या”

MH 28 News Live : चिखली : तालुक्यात गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून, पूर पाण्याने उभ्या पिकांचा घास घेतल्याने शेतकरी अक्षरशः हतबल झाले आहेत. या आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने सरसकट नुकसानभरपाई द्यावी, अशी ठाम मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दि. २६ ऑगस्ट रोजी चिखली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.

पिके जोमात असतानाच अचानक आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांचे सर्व श्रम वाया गेले. हुमणी अळीच्या कचाट्यातून वाचविलेली पिके आता पूरपाण्याने नष्ट झाली. अनेक शेतांमध्ये अजूनही पाणी साचलेले असून, पिके कुजून गेली आहेत. इतकेच नव्हे तर शेतातील विहिरी देखील खचल्याने शेतीपयोगी साधनसामग्रीची हानी झाली आहे. शासनाने पंचनामे सुरू केले असले तरी नेहमीप्रमाणे मिळणारी नुकसानभरपाई ही अपुरीच राहणार असल्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे.

“शेतकऱ्यांनी पेरणीपासून आजपर्यंत पिक वाचविण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली आहे. त्यामुळे त्यांच्या कष्टाचा विचार करून शासनाने तातडीने व सरसकट मदत करावी. शेतकरी शासनाकडे भिक मागत नाहीत, परंतु सरकारच शेतमालाचे भाव पाडते आणि शेतकऱ्यांना कोंडीत पकडते. यामुळे शेती व्यवसाय अडचणीत सापडला आहे,” असे शेट्टी यांनी ठणकावून सांगितले.

सरकारकडून होत आहे अन्नसुरक्षा कायद्याचा गैरवापर – राजू शेट्टी

शासन १९५५ च्या अन्न सुरक्षा कायद्याचा गैरवापर करून शेतमालाच्या भावांवर नको तितका हस्तक्षेप करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. यावेळी सरकारवर जोरदार टीका करताना त्यांनी म्हटले की, “मित्रपक्षाचा पालकमंत्री असतानाही अतिरिक्त सहपालकमंत्री नेमले जातात. हे सहपालकमंत्री म्हणजे वॉच डॉग आहेत. भाजपा मित्रपक्षाची कोंडी करत आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गांभीर्याने विचार केला पाहिजे ” असे मत राजू शेट्टी यांनी व्यक्त केले.

पूरग्रस्त शेतांची केली पाहणी

पत्रकार परिषदेनंतर राजू शेट्टी यांनी पूरग्रस्त शेतांची पाहणी केली. शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीमुळे ते मानसिकदृष्ट्या खचले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “शेतकरी पुन्हा उभा राहण्यासाठी शासनाने ठोस उपाययोजना केल्या पाहिजेत,” असे शेट्टी म्हणाले.

“ शेतकऱ्यांसाठी शेवटपर्यंत लढणार ! ”

“पाशा पटेल व शरद जोशींच्या विचारधारेत बदल झाला असला तरी मी मात्र शेतकऱ्यांसाठी शेवटपर्यंत लढत राहणार,” असेही राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले. या वेळी मयुर बोर्डे, अनिल वाकोडे यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129