♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

८४१ मतांचा वाद : बुलढाण्यातील निकाल न्यायालयीन पायरीवर, जयश्रीताई शेळके यांची फेरमोजणीची मागणी

MH 28 News Live / बुलढाणा : बुलढाणा विधानसभा निवडणुकीचा निसटता निकाल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवार जयश्रीताई शेळके यांनी अवघ्या ८४१ मतांच्या फरकाने झालेल्या पराभवानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात निवडणूक याचिका दाखल केली आहे. मतमोजणी प्रक्रियेत गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप करत त्यांनी फेरमोजणीची मागणी केली आहे.

गेल्या निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) चे संजय गायकवाड ९१ हजार ६६० मतांनी विजयी झाले होते, तर जयश्रीताई शेळके यांना ९० हजार ८१९ मते मिळाली होती. या निसटत्या फरकामुळेच निकालावर संशय व्यक्त करत शेळके यांनी न्यायालयीन लढाई छेडली आहे.

शेळके यांचे आरोप

शेळके यांनी आपल्या याचिकेत अनेक गंभीर मुद्दे मांडले आहेत.

मतदार यादीत तब्बल ३ हजार ५६१ बोगस नावे होती.

अनेक मतदारांची नावे दोन-तीन ठिकाणी होती.

काही मृत व्यक्तींच्या नावावर मतदान झाले

या अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर सर्व ईव्हीएम न्यायालयात आणून प्रत्यक्ष न्यायालयासमक्ष पुन्हा मोजणी व्हावी, अशी त्यांची ठाम मागणी आहे. याशिवाय मतदारयादी, मतदान केंद्रावरील सीसीटीव्ही फुटेज आणि विजयाचे प्रमाणपत्रही न्यायालयात सादर करण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती त्यांनी केली आहे.

गायकवाड यांचा प्रतिअर्ज

शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी मात्र ही याचिका फेटाळून लावावी म्हणून दिवाणी प्रक्रिया संहितेतील ऑर्डर ७, नियम ११ अंतर्गत अर्ज दाखल केला आहे. मात्र, शेळके यांनी त्यावर प्रतिवाद करत हा अर्ज निराधार व गुणवत्ताहीन असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे न्यायालयाने केवळ याचिकेच्या गुणवत्तेवर निर्णय द्यावा, असा आग्रह त्यांनी धरला आहे.

राजकीय पडसाद

या निकालावरील वादामुळे बुलढाणा मतदारसंघातील राजकारण चांगलेच तापले आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देखील महाराष्ट्रातील निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर मतचोरी झाल्याचा आरोप केला होता. त्यानंतर जयश्रीताई शेळके यांनी दाखल केलेली याचिका अधिक गाजू लागली आहे. न्यायालय या वादात कोणता निर्णय देते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129