
पेनटाकळी प्रकल्पातून विसर्गाची शक्यता; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
MH 28 News Live / पेनटाकळी : पेनटाकळी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जलाशयात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक वाढली असून, प्रकल्पातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे. परिणामी, जलाशय परिचालन सूचीप्रमाणे पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी कोणत्याही क्षणी वक्रद्वारे (गेट्स) उघडून नदी पात्रात पाण्याचा विसर्ग करण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर, पेनटाकळी प्रकल्पाच्या पूर नियंत्रण कक्षाकडून आज अधिकृत इशारा जारी करण्यात आला असून, प्रकल्पाच्या खालील भागातील नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अचानक विसर्ग झाल्यास जीवित वा मालमत्तेची हानी टाळण्यासाठी सुरक्षित अंतर राखण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
पावसाचे प्रमाण लक्षात घेता पुढील काही दिवस पेनटाकळी प्रकल्पातील विसर्गाचा धोका कायम राहू शकतो, अशी माहिती संबंधित प्रशासनाकडून देण्यात आली आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूत्रांकडून मिळणाऱ्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.