
हावर्डकडे झेपावला शेतकऱ्याचा मुलगा; चिखला येथील एकनाथ वाघांची प्रेरणादायी संघर्षगाथा
MH 28 News Live / बुलढाणा : तालुक्यातील चिखला या छोट्या गावात शेतकरी कुटुंबात जन्मलेला एकनाथ वाघ आज जगभर चर्चेत आहे. जागतिक कीर्तीच्या हार्वर्ड विद्यापीठात पब्लिक पॉलिसी शिक्षणासाठी प्रवेश मिळवून त्याने आपल्या संघर्ष, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर अभूतपूर्व यश संपादन केले आहे. ग्रामीण पार्श्वभूमीवरून जगाच्या दर्जाच्या विद्यापीठापर्यंतचा त्याचा प्रवास लाखो तरुणांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.
संघर्षातून उभी राहिलेली वाटचाल
जिल्हा परिषद शाळेतून सुरू झालेला एकनाथचा शैक्षणिक प्रवास नवोदय विद्यालय, पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय आणि पुढे पुणे विद्यापीठापर्यंत पोहोचला. अर्थशास्त्र आणि शिक्षणशास्त्र या विषयांत पदवी-पदव्युत्तर शिक्षण घेताना त्याने समाजासाठी काही करण्याचे स्वप्न जपले. सिव्हिल सेवा परीक्षेत अपयश आल्यानंतरही त्याने हार न मानता योग्य धोरणांनी समाजातील तळागाळातील लोकांचे जीवन बदलवावे या ध्येयाने पब्लिक पॉलिसीकडे वाटचाल केली.
हावर्ड विद्यापीठ : ३९० वर्षांचा इतिहास असलेले जागतिक शिक्षणाचे शिखर
हावर्ड विद्यापीठ हे अमेरिकेच्या मॅसेच्युसेट्स राज्यातील केंब्रिज शहरात वसलेले एक जागतिक कीर्तीचे विद्यापीठ आहे. याची स्थापना इ.स. १६३६ मध्ये झाली असून हे अमेरिकेतील सर्वांत जुने उच्च शिक्षण संस्थांपैकी एक मानले जाते. हार्वर्डचे नाव त्याचे प्रमुख दाते जॉन हार्वर्ड यांच्या स्मरणार्थ देण्यात आले.
आज हावर्ड विद्यापीठाचे शैक्षणिक दर्जा अत्यंत उच्च पातळीचा असून ते सतत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असते. विज्ञान, तंत्रज्ञान, कायदा, वैद्यक, व्यवस्थापन, साहित्य आणि समाजशास्त्र अशा विविध शाखांमध्ये संशोधन, अध्यापन आणि नवसर्जनासाठी ते अग्रणी मानले जाते. जगभरातील असंख्य विद्यार्थी या विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी प्रयत्नशील असतात, कारण येथे दिल्या जाणाऱ्या शिक्षणाची गुणवत्ता, जागतिक दर्जाचे प्राध्यापक आणि संशोधनसुविधा हे विद्यार्थ्यांना ज्ञानासोबत दृष्टीकोनही देतात.
हावर्ड विद्यापीठ जागतिक शैक्षणिक क्षेत्रात एक मार्गदर्शक भूमिका बजावते. नोबेल पारितोषिक विजेते, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, नामांकित वैज्ञानिक, साहित्यिक आणि उद्योजक यांच्यासह अनेक महान व्यक्तिमत्वे येथून घडली आहेत. त्यामुळेच हार्वर्ड केवळ एक शिक्षणसंस्था नसून आधुनिक जगाच्या घडणीतील एक महत्त्वाचा स्तंभ मानला जातो.
अथक परिश्रमाचे फळ
गेल्या तीन वर्षांत परदेशी शिक्षण संस्थांमध्ये प्रवेशासाठी त्याने सातत्याने प्रयत्न केले. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये प्रवेश मिळूनही शिष्यवृत्तीअभावी जाऊ शकला नाही, तर गेल्या वर्षी हार्वर्डमध्ये प्रवेश असूनही तांत्रिक अडचणींमुळे थांबावे लागले. मात्र, चिकाटी आणि धैर्याच्या जोरावर अखेर यावर्षी त्याचे स्वप्न पूर्ण होत आहे. याच काळात तो ‘एकलव्य संस्थेच्या ग्लोबल स्कॉलर्स’ या कार्यक्रमाशी जोडला गेला आणि इतर दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी मार्गदर्शन करत राहिला.
आई-वडिलांच्या त्यागातून जागतिक शिखरावर
आई-वडिलांनी कधी शाळेची पायरीही चढलेली नाही, अशा शेतकरी कुटुंबातून एकनाथने जगातील सर्वोच्च विद्यापीठापर्यंत पोहोचण्याची किमया साधली आहे. मुलाला शिकवण्यासाठी पालकांनी कष्ट सोसले, त्याग केला, आणि आज त्यांचे स्वप्न पूर्ण झाले. हार्वर्डमध्ये प्रवेश हा केवळ एकनाथचा वैयक्तिक यश नसून ग्रामीण कुटुंबाच्या त्यागाचा विजय आहे. एकनाथ वाघ हे नाव आज संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाचा विषय ठरले आहे.