♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

स्वातंत्र्यप्राप्तीला उजाडले ७९ वे साल; रस्त्याविना दानापूर खुर्दच्या गावकऱ्यांचे मात्र हाल… जीव धोक्यात घालून करतात ग्रामस्थ प्रवास

MH 28 News Live / संग्रामपूर : तालुक्यातील दानापूर खुर्द गावाला स्वातंत्र्यानंतरही रस्ताच नाही. वान नदीकाठच्या या गावातील दीडशे-दोनशे नागरिकांना रोज धोकादायक पायवाटेने प्रवास करावा लागतो. विद्यार्थी शिक्षणासाठी तर ग्रामस्थ बाजारपेठेसाठी नदी पार करून शेजारच्या अकोला जिल्ह्यातील दानापूर येथे जातात.

पुल झाला पण रस्ता नाही
शासनाने वाण नदीवर पूल बांधला; पण गावाशी जोडणारा रस्ता न झाल्याने नागरिक आजही संकटात आहेत. उंच उतरणीवरील पायवाट वृद्ध, महिला आणि मुलांसाठी जीवघेणी ठरत आहे.

ग्रामपंचायतीचा ठराव रखडलेला
सन २०२२ मध्ये ग्रामपंचायतीने रस्ता करण्याचा ठराव तहसीलदारांकडे दिला होता; मात्र शेतजमिनीच्या वादामुळे प्रस्ताव अजूनही अडकलाच आहे.

गावात मूलभूत सुविधांचा अभाव
गावात प्राथमिक शाळा नाही. त्यामुळे लहान मुलांनाही नदी पार करून शिक्षण घ्यावे लागते. रेशनसाठी सोगोडा गावात जावे लागते. स्मशानभूमी नसल्याने अंत्यविधी नदीपात्रातच करावे लागतात.

गावकऱ्यांच्या प्रतिक्रिया
“४० वर्षांपासून मुलांना नदीकाठावरून शिक्षणासाठी धोकादायक प्रवास करावा लागतो. शासनाने हा प्रश्न लवकर सोडवावा.”
— संजय तायडे, ग्रामस्थ दानापूर खुर्द

“गावाला रस्ता नसल्याने पुल असूनही आम्ही उपयोग करू शकत नाही. मुलाबाळांना त्रास सहन करावा लागतो.”
— महादेव कासोकार, पोलिस पाटील, सोगोडा गट ग्रामपंचायत

“रस्त्याचा पाठपुरावा आम्ही शासनदरबारी केला आहे; पण शेतजमिनीच्या अडथळ्यामुळे काम रखडले आहे.”
— मोहन मेतकर, उपसरपंच, सोगोडा गट ग्रामपंचायत

“महिलांची मोठी अवहेलना होते. मी साठ वर्षांची आहे, पायवाटेने खाली उतरणे फारच त्रासदायक ठरते.”
— कलाबाई कांबळे, ग्रामस्थ दानापूर खुर्द

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129