
विसर्जनात दोन जीव हरपले, खामगाव आणि संग्रामपूर तालुक्यात दोघांचा बुडून मृत्यू
MH 28 News Live / बुलढाणा : सार्वजनिक गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच ७ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने गणेश मूर्ती विसर्जनादरम्यान जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन तरुणांचे पाण्यात बुडून निधन झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे दोन्ही गावांमध्ये शोककळा पसरली असून मृतांच्या कुटुंबीयांना शासनाने तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

खामगाव तालुक्यातील वझर गावातील २१ वर्षीय पवन गणेश मोहीते गणेश विसर्जनासाठी गेले असताना दुर्दैवाने तलावात बुडाले. पहाटेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. ग्रामस्थांनी व एसडीआरएफच्या जवानांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा जीव वाचविता आला नाही. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, अकोला व बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेवरील संग्रामपूर तालुक्यातील काकनवाडा बु. येथेही दुःखद अपघात घडला. सिद्धार्थ रामदास भिलंगे (वय ३८) हे ७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता शेतातून परत येत असताना वान नदीपात्रात पाय घसरून खोल पाण्यात गेले आणि त्यांचा मृत्यू झाला. गणपती विसर्जनाच्या दुसऱ्याच दिवशी ही दुर्घटना घडल्याने गावात शोककळा पसरली आहे.

दोन्ही घटनांमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांच्या गावांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. या दुर्दैवी प्रसंगानंतर मृतांच्या कुटुंबीयांना शासनाने तत्काळ मदत द्यावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.



