
मलकापूर पांग्रा बाजारात तृतीयपंथीयांचा धुमाकूळ; व्यापाऱ्याला मारहाण
MH 28 News Live / सिंदखेडराजा : तालुक्यातील मलकापूर पांग्रा येथील आठवडी बाजारात तृतीयपंथीयांच्या दादागिरीमुळे व्यापारी व बाजारकरू हैराण झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून काही तृतीयपंथी बाजारात येऊन व्यापाऱ्यांकडून जबरदस्तीने पैसे उकळत असून पैसे न दिल्यास अश्लील हावभाव करून गोंधळ घालण्याचे प्रकार सुरू आहेत. यामुळे बाजारातील व्यापारी व ग्राहक त्रस्त झाले आहेत. मात्र, साखरखेडा पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे.
व्यापाऱ्याला मारहाण
आज (शुक्रवार) मलकापूर पांग्रा येथे झालेल्या आठवडी बाजारात दोन ते तीन तृतीयपंथी इनोव्हा कारमधून आले. नेहमीप्रमाणे त्यांनी व्यापाऱ्यांकडून पैसे मागण्यास सुरुवात केली. एका भाजी विक्रेत्याने दहा रुपये दिले असता “वीस रुपये पाहिजेत” असा आग्रह धरून त्याच्यासोबत वाद घातला. त्यानंतर दुकानासमोर गोंधळ घालत त्या विक्रेत्याला मारहाण करण्यात आली. या घटनेमुळे बाजारात काही काळ तणाव निर्माण झाला. मात्र नागरिक जमा होताच तृतीयपंथी इनोव्हा गाडीतून पसार झाले.

व्यापारी वर्ग त्रस्त
व्यापाऱ्यांनी सांगितले की, तृतीयपंथी पैसे न दिल्यास साडी वर करून अश्लील हालचाली करत गर्दी जमवतात आणि दादागिरीने पैसे वसूल करतात. त्यामुळे व्यापारी भयभीत झाले आहेत. “यावर तातडीने बंदोबस्त घालावा,” अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे.

पोलिसांवर दुर्लक्षाचा आरोप
सिंदखेडराजा तालुक्यातील सर्वात मोठा आठवडी बाजार मलकापूर पांग्रा येथे भरतो. मात्र येथे पोलिस बंदोबस्त नसल्याने चोरी, खिसेकापू व जबरदस्ती वसुलीचे प्रकार वाढले आहेत. कधी कधी पोलिस कर्मचारी येऊन केवळ फोटोसेशन करून निघून जातात, असा आरोप करण्यात येत आहे. थेट बाजारात दादागिरी करून व्यापाऱ्यांना त्रास दिला जात असताना पोलिस मात्र हातावर हात धरून बसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

👉 व्यापाऱ्यांची मागणी
बाजारात कायमस्वरूपी पोलिस बंदोबस्त लावावा
जबरदस्तीने पैसे उकळणाऱ्या तृतीयपंथीयांवर कठोर कारवाई करावी



