
मोताळ्याचे तहसीलदार हेमंत पाटील सापळ्यात अडकले; दोन लाखांची लाच घेताना रंगेहात पकडले
MH 28 News Live / मोताळा : तालुक्यातील ग्राम थड येथील शेतजमिनीचा भोगवटदार वर्ग-२ मधून वर्ग-१ मध्ये रूपांतरण करून ती विक्रीसाठी मंजुरी मिळवून देण्याच्या मोबदल्यात तहसीलदार हेमंत पाटील यांनी तब्बल दोन लाख रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अकोला (ACB) यांनी पाटील यांना त्यांच्या राहत्या घरी रंगेहात पकडले.
मागणीपासून सापळ्यापर्यंतचा प्रवास
तक्रारदाराचे मामा यांच्या गट क्रमांक २३ मधील १.६२ हेक्टर शेतजमिनीच्या रूपांतरणासाठी तहसीलदार हेमंत पाटील यांनी प्रति एकर ५० हजार रुपये या हिशोबाने एकूण दोन लाख रुपयांची मागणी केली होती. तक्रारदारास लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी ३ सप्टेंबर रोजी एसीबीकडे तक्रार नोंदवली. त्यानंतर १४ सप्टेंबर रोजी बुलढाणा शहरातील रामलक्ष्मी नगर, गायकवाड ले-आऊट येथील पाटील यांच्या राहत्या घरी यशस्वी सापळा रचण्यात आला.सापळा कारवाईदरम्यान तहसीलदार पाटील यांनी मागणी केलेली लाच रक्कम पंचासमक्ष स्वीकारली. मात्र संशय आल्याने त्यांनी ती रक्कम शौचालयात फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. तरीही एसीबी पथकाने ती रक्कम जप्त केली.

पुढील कारवाई
या प्रकरणी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून तहसीलदार हेमंत पाटील यांना अटक करण्यात आली आहे.

पथकाचे कौतुकास्पद कार्य
ही कारवाई पोलीस अधीक्षक (एसीबी अमरावती परिक्षेत्र) मारुती जगताप, अपर पोलीस अधीक्षक सचिंद्र शिंदे, उपअधीक्षक मिलिंदकुमार बहाकर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी अतुल इंगोले व त्यांच्या पथकाने केली. या पथकात पोलीस निरीक्षक दिगंबर जाधव, अविनाश पाचपोर, गोपाल किरडे, संदिप ताले, असलम शहा, निलेश शेगोकार, अर्चना घोडेस्वार व चालक नफिस यांचा समावेश होता.
👉 ही घटना बुलढाणा जिल्ह्यातील भ्रष्टाचारविरोधी कारवायांना नवीन गती देणारी ठरली आहे.



