♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

ऑनलाईन सेंटरचा काळाबाजार उघड; चिखलीत तहसीलदारांची धडक कारवाई ! संशयितांवर छापे, सीपीयू जप्त, अनधिकृत ऑनलाईन सेंटर चालकांची उडाली धावपळ…

MH 28 News Live / चिखली : बाहेरगावच्या आयडीचा वापर करून चिखली शहरात बेकायदेशीरपणे ऑनलाईन सेतू सुविधा केंद्रे सुरू करणाऱ्यांचा सुळसुळाट झाल्याचे उघडकीस आले आहे. या अवैध सेंटरमधून सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक लूट सुरू असल्याच्या तक्रारींनंतर अखेर महसूल विभाग हलला.

आज १५ सप्टेंबर रोजी चिखलीचे तहसीलदार संतोष काकडे यांनी शहरातील काही संशयास्पद ऑनलाईन सेंटरवर छापे घालून चौकशी केली. या कारवाईदरम्यान किसान ऑनलाईन सेंटर व झेरॉक्स (विनोद बोर्डे) येथील संगणकाचा सीपीयू जप्त करण्यात आला, तर कोठाळे ऑनलाईन सेंटर आणि ओम झेरॉक्स येथे पंचनामे करण्यात आले. कारवाईची माहिती मिळताच इतर अवैध सेंटर चालकांनी आपल्या दुकानांना कुलूप ठोकून पळ काढल्याचे समजते.

शहरात अधिकृत केवळ चारच केंद्रे

तहसील कार्यालयाच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली. संपूर्ण चिखली शहरात केवळ चारच अधिकृत परवानाधारक सेतू सुविधा केंद्रे कार्यरत आहेत.

कैलास इंगळे – तहसील कार्यालयाला लागून असलेल्या नगरपालिका गाळ्यामध्ये

महाजन – आठवडी बाजार परिसरात

लोखंडे – शिवाजीनगर

संतोष तायडे – जुने गाव परिसरात

याशिवाय सुमारे २० केंद्रे पूर्णपणे बोगस आयडीवर सुरू असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

नागरिकांची उघड लूट सुरू

या अवैध केंद्रांकडून नागरिकांची लूट कशी चालते याचे उदाहरण पाहता, शासनाने ज्या कामासाठी केवळ २० रुपये फी निश्चित केली आहे, त्याच कामासाठी १०० रुपये आकारले जात आहेत. याशिवाय कर्मचाऱ्यांचा उद्धटपणा, दमदाटी, कागदपत्रे विलंबाने देणे अशा तक्रारींचा पाढा अधिकाऱ्यांसमोर मांडला गेला आहे.

बोगस आयडी होणार ब्लॉक

तहसील कार्यालयाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ग्रामीण भागातील आयडी वापरून चिखलीत चालणाऱ्या या केंद्रांचे आयडी लवकरच कायमस्वरूपी ब्लॉक केले जाणार आहेत. महसूल विभागाची ही कारवाई प्रत्यक्षात कधी होते, कितपत प्रभावी ठरते याची प्रतीक्षा शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी आणि सर्वसामान्य जनता आतुरतेने करत आहे.

तहसीलदारांसमोर मोठे आव्हान

सध्या हाताबाहेर गेलेला ऑनलाईन सेंटरचा कारभार वठणीवर आणणे हे तहसीलदार संतोष काकडे यांच्यासमोर मोठे आव्हान ठरणार आहे. या अवैध केंद्रांवर कडक कारवाई करून नागरिकांना दिलासा मिळतो का, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.

👉 थोडक्यात :

अवैध ऑनलाइन सेंटरवर तहसीलदारांचा छापा

सीपीयू जप्त, दोन ठिकाणी पंचनामे

अधिकृत फक्त ४, बेकायदेशीर तब्बल २० केंद्रे

नागरिकांची उघड लूट; २० रुपयांचे कामासाठी १०० रुपये वसुली

सर्व बोगस आयडी लवकरच होणार ब्लॉक

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129