♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

दागिने खरेदीच्या व्यवहारात १ कोटीं ६२ लाखांची फसवणूक, खामगावात खळबळ; गुन्हा दाखल

MH 28 News Live / खामगाव : शहरात ज्वेलर्सकडून दागिने खरेदीच्या व्यवहारात तब्बल १ कोटी ६२ लाख ४४ हजार ९३९ रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी खामगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, रिशी संदीप खत्री (२४, रा. रायगड कॉलनी, खामगाव) याने फिर्यादी जितेंद्र मुरलीधर सोनी (५५, रा. मेन रोड, खामगाव) तसेच व्यापारी अभिषेक महेश शेलार यांचा विश्वास संपादन करून त्यांच्या फर्मकडून सोन्याचे दागिने घेतले. फिर्यादीच्या फर्मकडून तब्बल १ कोटी ३७ लाख ४० हजार ५५७ रुपये, तर शेलार यांच्या फर्मकडून २५ लाख ४ हजार ३८२ रुपये किमतीचे दागिने आरोपीने घेतले. मात्र, त्याबदल्यात दिलेले धनादेश अपुरे ठरल्याचे उघड झाले.

या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३१६(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास बुलडाणा आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रकाश सदगीर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

या प्रकरणामुळे खामगावातील व्यापारी वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून पुढील तपास जलदगतीने सुरू असून, अशा प्रकारची फसवणूक झाल्याची शंका असल्यास संबंधितांनी तात्काळ आर्थिक गुन्हे शाखेकडे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129