
जमिनीच्या वादातून मुलाने केली आई-वडिलांची हत्या; चिखली तालुका हादरला
MH 28 News Live / चिखली : तालुक्यातील अमरापुर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या किन्ही सवडद गावात जमिनीच्या वादातून मुलानेच आपल्या जन्मदात्या आई-वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी (२७ सप्टेंबर) सायंकाळी घडली. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

जमिनीच्या विक्रीवरून वाद, संतापाचा उद्रेक
मृतांमध्ये महादेव त्र्यंबक चोपडे (७०) आणि पत्नी कलावतीबाई चोपडे (६५) यांचा समावेश आहे. त्यांचा धाकटा मुलगा गणेश महादेव चोपडे (३१) याने आई-वडिलांवर हल्ला करून त्यांचा बळी घेतला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही मुलांना जमिनीचे हिस्से देण्यात आले होते; मात्र आई कलावतीबाई यांच्या नावे असलेली जमीन विकण्यावरून घरात वाद सुरू होता. शनिवारी सायंकाळी पुन्हा झालेल्या वादात गणेशने संतापाच्या भरात आई-वडिलांना बेदम मारहाण केली. यात गंभीर जखमी झालेल्या दांपत्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

पोलिसांची तत्काळ कारवाई, आरोपी अटकेत
घटनेची माहिती मिळताच अमडापूर पोलिस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह चिखली ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. आरोपी गणेश चोपडे याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना फक्त शेतीच्या वादातून झाली का, की त्यामागे इतर काही कारणे आहेत, हे तपासात स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.



