
चिखलीच्या त्या बेपत्ता हॉटेल चालकाचा मृतदेह दिवठाणा नदीत आढळल्याने खळबळ
MH 28 News Live / चिखली तालुक्यातील रामानंद नगर येथील ४५ वर्षीय हॉटेल व्यावसायिक दिलीप राजाराम मोरे यांचा मृतदेह दिवठाणा नदीत आढळून आला असून परिसरात खळबळ उडाली आहे.

मोरे हे २८ सप्टेंबर रोजी किराणा आणण्यासाठी घरातून बाहेर पडले, मात्र त्यानंतर ते परतलेच नाहीत. नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला, परंतु कुठेच सुगावा लागला नाही. अखेर ३० सप्टेंबर रोजी चिखली पोलिस ठाण्यात त्यांच्या बेपत्ता होण्याची नोंद करण्यात आली होती.

चार दिवसांपासून गायब असलेले मोरे यांचा मृतदेह अखेर नदीपात्रात सापडल्याने हा अपघात, आत्महत्या की घातपात, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. घटनेचा तपास सुरू असून मृत्यूचे नेमके कारण उघडकीस येणे बाकी आहे. या अनाकलनीय मृत्यूमुळे परिसरात चर्चेला उधाण आले असून नातेवाईकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.



