
धाड व धामणगाव बढे तालुका घोषित करण्याची भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांची मागणी
MH 28 News Live / बुलढाणा : राज्यात नवीन जिल्हे व तालुके निर्माण करण्याच्या हालचालींना वेग आला असून या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्हा भाजप अध्यक्ष व माजी आमदार विजयराज शिंदे यांनी धाड आणि धामणगाव बढे या दोन ठिकाणांना स्वतंत्र तालुक्यांचा दर्जा देण्याची मागणी केली आहे. ही मागणी त्यांनी १३ ऑक्टोबर रोजी अमरावती विभागीय भाजपा बैठकीदरम्यान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली.

शिंदे यांनी सांगितले की, महसूल मंत्री बावनकुळे यांनी या मागणीची दखल घेत राज्याचे महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांना या प्रस्तावाचा विचारात घेण्यासाठी लेखी आदेश दिल्याची माहिती दिली आहे. राज्य सरकार लवकरच २० नवीन जिल्हे आणि ८१ नवीन तालुके स्थापन करण्याचा निर्णय घेणार असल्याचे संकेत अलीकडेच महसूल मंत्र्यांनी दिले होते. त्या पार्श्वभूमीवर धाड आणि धामणगाव बढे यांचा प्रस्ताव महत्त्वाचा ठरणार आहे.

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, धाड आणि धामणगाव बढे या दोन्ही गावांची लोकसंख्या सुमारे २५ हजार असून परिसरातील ६० ते ७० गावे या केंद्रांशी नैसर्गिकरीत्या जोडलेली आहेत. एकत्रित लोकसंख्या १ लाखांहून अधिक असल्याने दोन्ही ठिकाणे प्रशासकीयदृष्ट्या सक्षम ठरतात. सध्याच्या तालुका ठिकाणांपासून ही गावे दूर असल्याने नागरिकांना प्रशासकीय, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक सेवांसाठी मोठा प्रवास करावा लागतो. त्यामुळे तालुका दर्जा मिळाल्यास स्थानिक प्रशासन अधिक जलद, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख बनेल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या दोन्ही गावांमध्ये महाविद्यालये, उच्च माध्यमिक शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्रे, पोलिस ठाणे, कृषी सेवा केंद्रे, बँका आणि सहकारी संस्था यांसारख्या आवश्यक सुविधा आधीच उपलब्ध आहेत. त्यामुळे प्रशासकीय दृष्ट्या ही ठिकाणे नव्या तालुक्यांसाठी सक्षम असल्याचे शिंदे यांनी नमूद केले आहे. महसूल मंत्री बावनकुळे यांनी या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद दिल्याचा दावा विजयराज शिंदे यांनी केला असून, जिल्ह्यातील नागरिकांमध्येही या निर्णयाबाबत आशावाद निर्माण झाला आहे.



