♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

बुलढाण्यातील ‘संगीत खुर्ची’चा शेवट ! नीलेश तांबेच राहणार जिल्हा पोलीस अधीक्षक

MH 28 News Live / बुलढाणा : जिल्हा पोलीस अधीक्षकपदावरून गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या ‘संगीत खुर्ची’च्या नाट्यमय वादावर अखेर पडदा पडला आहे. १७ ऑक्टोबर रोजी केंद्रीय प्रशासनिक न्यायाधिकरणाने (कॅट) दिलेल्या निकालानुसार, नीलेश तांबे यांच्याच जिल्हा पोलीस अधीक्षकपदावर अधिकृतपणे शिक्कामोर्तब झाले आहे.

गेल्या पाच महिन्यांपासून या प्रकरणावर कॅटमध्ये सुनावणी सुरू होती. ८ सप्टेंबर रोजी या प्रकरणाची सुनावणी पूर्ण होऊन निकाल राखून ठेवण्यात आला होता. अखेर १७ ऑक्टोबर रोजी न्यायमूर्ती रंजीत मोरे यांच्या अध्यक्षतेखाली कॅटने निकाल देत तत्कालीन पोलिस अधीक्षक विश्व पानसरे यांची याचिका फेटाळली.

२२ मे रोजी विश्व पानसरे यांची बदली अमरावती येथील एसआरपीएफ गट क्रमांक ९ येथे करण्यात आली होती. त्यांच्या जागी नागपूर येथून नीलेश तांबे यांची बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती. पहिलीच जिल्हा अधीक्षक म्हणून जबाबदारी स्वीकारताना तांबे यांनी मध्यरात्रीच्या सुमारास बुलढाणा गाठून पदभार स्वीकारला होता.

दुसरीकडे, बदलीच्या निर्णयाविरोधात पानसरे यांनी कॅटमध्ये धाव घेतली होती. तारखांवर तारीख मिळत अखेर ८ सप्टेंबरला सुनावणी पूर्ण झाली. १७ ऑक्टोबरला दिलेल्या निकालात कॅटने पानसरे यांची याचिका फेटाळून तांबे यांच्या नियुक्तीला वैध ठरवले. या निर्णयामुळे अखेर बुलढाण्याच्या जिल्हा पोलीस अधीक्षकपदावरील अनिश्चिततेला पूर्णविराम मिळाला असून, नीलेश तांबेच या पदावर कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, पानसरे यांना त्यांच्या बदलीच्या ठिकाणी तत्काळ रुजू होण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129