
माणुसकीचा उजेड… दिवाळीत समाजसेवेचा दीप उजळला ! विजयसिंग खरे यांचे संवेदनशील आणि प्रेरणादायी कार्य
MH 28 News Live / चिखली : दिवाळीच्या प्रकाशमय वातावरणात समाजातील दुर्बल घटकांच्या आयुष्यातही आशेचा दिवा पेटवणारे कार्य म्हणजेच खरी माणुसकी. अशीच भावनिक आणि विधायक कृती करून भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस व युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस विजयसिंग खरे यांनी पुन्हा एकदा समाजसेवेचे तेज उजळले आहे.

चिखली शहरातील सविता हिम्मतराव इंगळे या गतिमंद महिला आणि त्यांचा मुलगा कृष्णा इंगळे हे शहरात भीक मागून आपला उदरनिर्वाह करीत होते. त्यांच्या संघर्षमय जीवनाची बाब खरे यांच्या निदर्शनास आली आणि त्यांनी कोणताही आर्थिक भार न पडू देता स्वतः पुढाकार घेत सविता इंगळे यांचे नवीन रेशन कार्ड तयार करून दिले.

यापूर्वीच चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेताताई महाले यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सविता इंगळे यांना महाराष्ट्र शासनाच्या “लाडकी बहीण योजनेचा” लाभ मिळवून दिला होता. या योजनेतून मिळणाऱ्या आर्थिक सहाय्यामुळे सविता इंगळे नागपूर येथे सुरु असलेल्या आपल्या उपचारांचा खर्च भागवू शकतात, असे त्यांनी आनंदाने सांगितले.

लोकसेवेचा दीप – संवेदनांचा सण
आज दिवाळीच्या शुभप्रभात सविता इंगळे यांना रेशन कार्ड सुपूर्त करण्यात आले. या प्रसंगी पत्रकार कैलास गाडेकर, पत्रकार छोटू कांबळे, पत्रकार रवींद्र फोलाने, तेजराव सोनवणे, ज्येष्ठ पत्रकार कृष्ण कुडके, तसेच माजी उपसरपंच सोनूभाऊ इंगळे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

या उपक्रमाबद्दल समाजातील विविध स्तरांतून विजयसिंग खरे यांच्या कार्याचे कौतुक होत आहे. विजयसिंग खरे म्हणाले, “आपल्या आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांच्या प्रेरणेने चिखली शहरातील गोरगरीब, दिव्यांग व दिनदुबळ्या बांधवांची सेवा करण्याचे व्रत मी हाती घेतले आहे. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत शासनाच्या योजना पोहोचवणे हेच माझे ध्येय आहे. त्यांच्या या संवेदनशील आणि समाजाभिमुख कार्यामुळे सविता इंगळे यांना केवळ शासनसहाय्यच मिळाले नाही, तर स्वाभिमानाने जगण्याची नवी आशाही लाभली. विजयसिंग खरे यांच्यासारख्या समाजसेवकांमुळे लोकसेवा, माणुसकी आणि संवेदना या दिवाळीच्या दिव्यांपेक्षाही अधिक उजळ भासतात.



