
नोव्हेंबरपासून दोन महिन्यांसाठी रेशन दुकनावर मिळणार मोफत ज्वारी
MH 28 News Live / : मुंबई : राज्यातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या वर्षी महाराष्ट्रात ज्वारीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाल्याने राज्य सरकारने त्याची मोठ्या प्रमाणात खरेदी केली आहे. त्यामुळे येत्या नोव्हेंबरपासून दोन महिन्यांसाठी रेशन दुकानांतून ज्वारीचे मोफत वाटप करण्यात येणार आहे.

केंद्र सरकारकडून किमान आधारभूत किंमत (एमएसपी) खरेदी योजनेअंतर्गत भरडधान्य खरेदी करण्याच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार २०२४-२५ या वर्षात राज्यात ज्वारीचे अतिरिक्त उत्पादन झाल्याने सरकारने त्याची मोठ्या प्रमाणात खरेदी केली. आता ही ज्वारी नागरिकांना मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अन्न व नागरी पुरवठा विभागाने सर्व जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना कार्यवाहीसाठी सूचना दिल्या आहेत. त्यानुसार अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनेच्या लाभार्थ्यांना प्रत्येकी एक किलो ज्वारीचे वितरण करण्यात येईल. नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांसाठी हे मोफत वाटप सुरु राहणार आहे. राज्यातील पुणे शहर आणि जिल्हा, सातारा, सांगली, नांदेड, परभणी, धाराशिव, बीड, अहिल्यानगर, लातूर, सोलापूर शहर व जिल्हा या १२ जिल्ह्यांसाठी एकूण २२ हजार ७६६ टन ज्वारी लागणार आहे. तसेच हिंगोली, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यांसाठी ४ हजार १३ टन ज्वारी आवश्यक आहे.

धान्य उचलण्याच्या दृष्टीने अकोला केंद्रातून हिंगोली, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यांसाठी तर बुलढाणा केंद्रातून उर्वरित १२ जिल्ह्यांसाठी धान्य वितरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. पुणे शहरासाठी १,३७४ टन आणि जिल्ह्यासाठी २,८४४ टन, म्हणजेच एकूण ४,२१८ टन ज्वारीची आवश्यकता भासणार आहे. राज्य सरकारचा हा निर्णय ग्रामीण व शहरी भागातील सर्वसामान्य जनतेसाठी दिलासा देणारा ठरणार असून, ज्वारी उत्पादनास प्रोत्साहन मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.



