
नगर परिषद निवडणुकीत असामाजिक तत्वांचा शिरकाव ? राजकीय कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता
MH 28 News Live / बुलढाणा : राजकारण आणि गुन्हेगारी यांचं नातं दिवसेंदिवस अधिक घट्ट होत चालल्याचं कटू वास्तव आता स्थानिक पातळीवरही स्पष्ट दिसू लागलं आहे. राष्ट्रीय व प्रादेशिक स्तरावर सुरू झालेली ही दूषित प्रवृत्ती आता नगर पातळीपर्यंत झिरपत आली आहे. जिल्ह्यात होऊ घातलेल्या नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या गोटात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या असामाजिक तत्त्वांचा वाढता वावर ही चिंताजनक बाब बनली आहे. कोणताही पक्ष सत्तेत असो; आपल्या बेकायदेशीर धंद्यांना अभय मिळवण्यासाठी हे समाजकंटक राजकीय आश्रय शोधत असतात. स्वतःच्या अवैध कृत्यांवर पडदा टाकण्यासाठी राजकीय पद किंवा पक्षीय तिकीट मिळवणे व याद्वारे सत्तेपर्यंत पोहोचणे आणि या सत्तेचा उपयोग आपल्या कृष्णकृत्यांना झाकण्यासाठी तसेच वाढवण्यासाठी करणे हा त्यांचा सोपा मार्ग ठरतो आहे. याच सोयीनुसार नगर पालिकेच्या निवडणुकीत त्यांनी काही राजकीय पक्षांकडे आपला मोर्चा वळवला आहे.

कार्यकर्त्यांत अस्वस्थता
नगर परिषद निवडणुकीसाठी काही प्रभागांमधून गुन्हेगारीशी संबंधित लोकांनी काही राजकीय पक्षांकडे उमेदवारीची मागणी केल्याचं समोर आलं आहे. यापैकी काहींचे बेकायदा धंद्यांशी थेट संबंध असल्याचे पुरावेही स्थानिक स्तरावर उपलब्ध आहेत. शिवाय काही लोक गुंडागर्दी, मारामारी, धमकावणे आदी गैरप्रकार करण्यात सराईत आहेत. या पार्श्वभूमीवर पक्षातील प्रामाणिक आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. त्यांना भीती आहे की, अशा संशयास्पद व्यक्तींना तिकीट दिल्यास प्रामाणिक कार्यकर्त्यांचे राजकीय भवितव्य अंधारात जाईल.

मतदारांची प्रतिक्रिया
सुजाण मतदार देखील या घडामोडींवर तीव्र प्रतिक्रिया देत आहेत. “सर्व पक्षांच्या नेतृत्वाने कार्यकर्त्यांचा आवाज ऐकून, स्वच्छ राजकारणाच्या मूल्यांना जपणारा निर्णय घ्यावा,” अशी जनतेची ठाम अपेक्षा आहे. लोकशाहीचा पाया स्वच्छतेवर आणि प्रामाणिकतेवर उभा असतो. जर गुन्हेगारी घटकांना राजकारणात अभय मिळालं, तर समाजाच्या हितासाठी राजकारण हे साधन न राहता सत्तेचा खेळ बनून जाईल, अशी सर्वसामान्यांची चिंता व्यक्त होत आहे. आगामी नगर परिषद निवडणूक ही फक्त राजकीय लढाई नाही, तर राजकीय तत्त्वांचा कस पाहणारी लोकशाहीची चाचणी आहे. प्रत्येक पक्षाच्या नेतृत्वाला जर आपल्या पक्षाला यश मिळावे असे वाटत असेल व खरोखरच शहराचा विकास करण्याची त्यांची प्रामाणिक इच्छा असेल तर गुन्हेगारीला राजकारणातून कायमचे बाहेर ठेवणे हीच खरी जनसेवा ठरेल अशी प्रतिक्रिया मतदारांमधून व्यक्त होताना दिसत आहे.



