
चिखलीत दुपारच्या सुमारास राडा! पेट्रोल पंपाजवळ चिकन दुकानदारांमध्ये तुंबळ हाणामारी
MH 28 News Live / चिखली : शहराच्या मध्यभागी आज दुपारी अक्षरशः रणांगणाचे चित्र पाहायला मिळाले. बोन्रेप पेट्रोल पंप ते डीपी रोडला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर उभ्या असलेल्या चिकन विक्रेत्यांमध्ये लाठ्या-काठ्यांनी तुंबळ हाणामारी झाली. साधारण १२ वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात काही काळ दहशतीचे वातावरण निर्माण झाले. आरडाओरडा, गोंधळ आणि पळापळीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे सावट पसरले.

मिळालेल्या माहितीनुसार, या हाणामारीचे मूळ २८ ऑक्टोबर रोजी झालेल्या एका लग्न समारंभातील वादात दडले आहे. त्या समारंभात झालेला किरकोळ वाद आज पुन्हा उफाळून आला आणि दोन्ही गट रस्त्यावरच आमनेसामने आले. काही क्षणांत दोन्ही बाजूंचे लोक एकमेकांवर तुटून पडले, तर पाहताच पाहता रस्त्यावर झुंबड उडाली.

घटनेची माहिती मिळताच चिखली पोलीस ठाण्याचे ठाणेदार संग्राम पाटील आणि त्यांची टीम घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी तत्परतेने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, या घटनेमुळे शहरात चर्चेचे वारे सुरू झाले आहेत.



