
लवकरच मोठा बदल ! अंत्योदय रेशन कार्डधारकांसाठी धान्यवाटपाची नवी पद्धत लागू
MH 28 News Live : शिधापत्रिका धारकांसाठी केंद्र सरकारकडून एक ऐतिहासिक निर्णय घेण्याची तयारी सुरू आहे. या नव्या निर्णयामुळे रेशनधारकांमधील धान्यवाटपातील असमानता दूर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अंत्योदय अन्न योजनेच्या लाभार्थ्यांसाठी रेशन वितरणाच्या नियमांमध्ये मोठा बदल करण्यात येणार आहे. सध्या या योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला निश्चित ३५ किलो धान्य दिले जाते. मात्र, नव्या नियमांनुसार वितरणाची पद्धत “प्रति कुटुंब” ऐवजी “प्रति व्यक्ती” या निकषावर आधारित असेल.

सद्यस्थितीत दोन सदस्य असलेल्या कुटुंबाला आणि सात सदस्यांच्या कुटुंबालाही सारखेच ३५ किलो धान्य मिळते. त्यामुळे लहान कुटुंबांना प्रमाणापेक्षा अधिक, तर मोठ्या कुटुंबांना अपुरे धान्य मिळण्याची विषमता निर्माण झाली आहे. हीच तफावत दूर करण्यासाठी सरकारने धान्यवाटप ‘प्रति सदस्य’ पद्धतीने करण्याचा निर्णय घेतल्याचे पुरवठा विभागाच्या सूत्रांनी सांगितले. मार्च २०२६ पर्यंत अंमलबजावणी; मोठ्या कुटुंबांना मिळणार दिलासा
केंद्रीय अन्न मंत्रालयाच्या अहवालानुसार, नव्या वितरण प्रणालीची अंमलबजावणी पुढील वर्षी मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. या योजनेनुसार प्रत्येक सदस्याला ७.५ किलो धान्य मिळणार असून, त्यामुळे पाच किंवा त्याहून अधिक सदस्य असलेल्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळेल.

नव्या नियमांची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर चार किंवा त्यापेक्षा कमी सदस्य असलेल्या कुटुंबांना सध्याच्या तुलनेत थोडे कमी धान्य मिळेल, तर मोठ्या कुटुंबांना अधिक अन्नधान्य मिळेल. सध्या देशभरात १.७१ कोटी अंत्योदय रेशन कार्डधारक कुटुंबे असून, त्यापैकी बहुसंख्य कुटुंबांमध्ये पाचपेक्षा कमी सदस्य आहेत.

सरकारचा दावा आहे की, या नव्या प्रणालीमुळे धान्याचे योग्य वाटप होईल, अपव्यय कमी होईल आणि खऱ्या अर्थाने गरजू लोकांपर्यंत अन्नसुरक्षेचा लाभ पोहोचेल. दरम्यान, सामान्य रेशन कार्डधारकांना सध्या प्रति व्यक्ती पाच किलो धान्य दिले जाते. परंतु, अंत्योदय योजनेअंतर्गत आता प्रति सदस्य 7.5 किलो धान्य देण्याची योजना अंमलात आणली जाणार आहे. थोडक्यात म्हणजे, नव्या निर्णयामुळे मोठ्या कुटुंबांना अधिक धान्य, लहान कुटुंबांना थोडे कमी धान्य आणि सरकारला अपेक्षित धान्य बचतीचा लाभ मिळणार आहे.



