♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

थरारक कौटुंबिक हत्याकांड : आई-वडिलांचा कुराडीने खून करून मुलाची आत्महत्या; सावरगाव डुकरे हादरलं!

MH 28 News Live / चिखली : तालुक्यातील सावरगाव डुकरे येथे घडलेल्या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेने परिसरात भीतीची दाट छाया पसरली आहे. ५ नोव्हेंबरच्या रात्री घडलेल्या या भयंकर कौटुंबिक हत्याकांडात मुलाने स्वतःच्या आई-वडिलांचा निघृणपणे खून करून अखेर स्वतःही जीव संपवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये सुभाष डीगंबर डुकरे (वय ७५), त्यांची पत्नी लता डुकरे (वय ६५) आणि मुलगा विशाल सुभाष डुकरे (वय ४२) यांचा समावेश आहे.

घटनेचा तपशील असा की, रात्री उशिरा घरातून आरडाओरड व संशयित हालचालींचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी पाहणी केली असता, घराचे दार आतून बंद असल्याचे दिसले. पोलिसांना माहिती कळताच चिखली पोलीस तत्काळ दाखल झाले. पोलिसांनी घराचे दार उघडून आत प्रवेश केला असता समोर उभा असलेला दृश्य क्षणभर अंगावर काटा आणणारा होता. आई-वडिलांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात तर विशालचा मृतदेह घराच्या मागील बाजूस आढळून आला.

नेमका वाद काय? कौटुंबिक किरकोळ कलह? की मानसिक तणावाचा टोकाचा परिणाम? या प्रश्नांची अद्याप स्पष्टता नाही. परिसरात मात्र “काय एवढं बिनसलं की मुलाने आई-वडिलांच्या जीवावर उठावं?” या प्रश्नावरून चर्चा सुरूच आहेत.

घटना कळताच पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील तसेच चिखली पोलीस स्टेशनचे ठाणेदार भूषण गावंडे घटनास्थळी दाखल झाले आणि पाहणी केली. घराला सील करून फॉरेन्सिक पथकाने तपासाची सूत्रे हाती घेतली आहेत.

तिन्ही मृतदेहांना जिल्हा उपरुग्णालय, चिखली येथे पोस्टमार्टमसाठी हलविण्यात आले असून, हत्याकांडामागील नेमका उद्देश, मानसिक स्थिती आणि घडामोडींची खरी कारणमीमांसा पुढील तपासातून समोर येणार आहे.

सावरगाव डुकरेमध्ये मात्र भीती, दुःख आणि अविश्वासाचं दाट सावट कायम आहे. गाव आजही अवाक् आहे — एकाच घरात, एका रात्रीत, एका क्षणात सर्व काही कोसळून गेलं.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129