
प्राचार्य निलेश गावंडे यांच्या प्रचारासाठी आ. सना मलिक शेख २८ नोव्हेंबरला चिखलीत; ना. माणिकराव कोकाटे यांचीही लाभणार उपस्थिती
MH 28 News Live : चिखली : नगरपरिषद निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) महायुतीने प्रचाराची गती वाढवली आहे. या प्रचारामध्ये अणुशक्ती नगरच्या आमदार आणि लोकप्रिय समाजसेविका सना मलिक शेख यांच्या चिखली दौऱ्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. २८ नोव्हेंबर रोजी चिंच परिसर भागातील जागृती अर्बन पतसंस्थेसमोर संध्याकाळी ५ वाजता भव्य सभा आयोजित करण्यात आली असून स्थानिक राजकीय वातावरणाला जोरदार उधाण येण्याची चिन्हे आहेत.
राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री माणिकराव कोकाटे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती. त्यांच्या सहभागामुळे सभेला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून चिखलीच्या विकास आराखड्याशी संबंधित काही महत्त्वपूर्ण घोषणा होऊ शकतात, अशी माहिती राजकीय वर्तुळातून देण्यात येते.
“सना मलिक शेख या संवेदनशील, सर्वसमावेशक आणि विकासाभिमुख कार्य करणाऱ्या लोकप्रिय नेत्या आहेत. त्यांची सभा ही चिखलीच्या विकासदृष्टीने महत्त्वाची ठरणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.” महायुतीकडून या सभेला मोठा प्रतिसाद मिळेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस – शिवसेना महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्राचार्य डॉ. निलेश गावंडे यांनी व्यक्त केला आहे.

सना मलिक शेख या शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, युवक विकास आणि वंचित घटकांसाठी सक्रियपणे कार्यरत असलेल्या सर्वसमावेशक नेतृत्वाचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे त्यांच्या चिखली भेटीबाबत स्थानिक मतदारांत उत्सुकता वाढत आहे. पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, कचरा व्यवस्थापन, पायाभूत सुविधा तसेच युवक–महिला विकास यांसारख्या मुद्द्यांवर सभेत मार्गदर्शन होण्याची अपेक्षा आहे. अल्पसंख्याक आणि वंचित घटकांसाठी विशेष कार्यक्रमांविषयीही मंत्री कोकाटे महत्त्वपूर्ण माहिती देणार असल्याचे पक्ष सूत्रांचे म्हणणे आहे.
सभेच्या तयारीसाठी राष्ट्रवादी आणि शिवसेना कार्यकर्त्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून घराघरात संपर्क मोहीम राबवली जात आहे. महायुतीच्या या शक्तीप्रदर्शनामुळे चिखलीतील निवडणूक वातावरणाला नवी दिशा मिळेल, असा अंदाज राजकीय चर्चांमध्ये व्यक्त होत आहे.



