
चिखलीत ६ व ७ डिसेंबर रोजी लक्ष्मीनारायण भाला यांचा सहस्रचंद्र दर्शन सोहळा
MH 28 News Live / चिखली : येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक श्री लक्ष्मीनारायण भाला उर्फ लक्खीदांचा सहस्रचंद्र दर्शन सोहळा ६ आणि ७ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यासाठी RSS चे भूतपूर्व सरकार्यवाह भैय्याजी जोशी तसेच अध्यात्मिक क्षेत्रातील अनेक मान्यवर येणार आहेत.
स्व. बन्सीलाल भाला आणि स्व. मनीबाई भाला यांचे सुपुत्र असलेले लक्ष्मीनारायण भाला गेली 58 वर्षे संघाचे आजीवन प्रचारक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी पश्चिम बंगाल, आसाम, अंडमान-निकोबार, उत्तर भारत, मध्य भारत, पूर्वोत्तर भारत आणि परदेशातील मॉरिशस येथेही संघाची विविध जबाबदारी सांभाळली आहे. सध्या ते 81 व्या वर्षी दिल्ली येथे प्रचारक म्हणून कार्यरत आहेत. नव्या पिढीला प्रेरणा मिळावी या उद्देशाने हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

६ डिसेंबर रोजी धार्मिक विधी आणि तुलादान होणार आहे. याच दिवशी या सोहळ्याच्या स्मरणिकेचे प्रकाशनही होणार आहे. उद्घाटन सत्राच्या अध्यक्षस्थानी विदर्भ प्रांत संघचालक दीपकराव तामशेट्टीवार असतील. या सत्रात स्वांतरंजनजी, सूर्यकांत केळकर, डॉ. अमित जैन, महामंडलेश्वर गुरु ममतादास, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आणि उत्तर प्रदेशचे माजी शिक्षण मंत्री डॉ. रवींद्र शुक्ल उपस्थित राहणार आहेत.
७ डिसेंबर रोजी भैय्याजी जोशी, विष्णुप्रपन्नाचार्यजी, जितेंद्रनाथ महाराज, पुरीचे शंकराचार्य अधोक्षजानंदजी, सौ. मनीषा संत, स्वामी राधाकांतजी आणि श्रीरामजी आरावकर उपस्थित राहून शुभेच्छा व आशीर्वाद देणार आहेत.
या कार्यक्रमासाठी देशभरातील अनेक चाहते आणि मान्यवर चिखलीत दोन दिवस मुक्काम करणार आहेत. भाला परिवार आणि चिखली परिसरातील अनेक कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम चिखली येथील हॉटेल स्वरांजलीच्या प्रांगणात पार पडत आहे. संघ स्वयंसेवक आणि संघप्रेमींसाठी हा सोहळा एक मोठी पर्वणी ठरणार आहे.



