
ॲड. विशाल यांच्या आदर्श विवाहातून जवंजाळ परिवाराने दिला प्रेरणादायी संदेश
MH 28 News Live / चिखली : समाजात आदर्श जीवनपद्धतीचा पुरस्कार करणारे अनेक जण मोठ्या आवाजात विचार मांडताना दिसतात; परंतु तेच विचार स्वतःच्या आयुष्यात आचरणात आणण्याची वेळ आली की बडेजाव, दिखाऊपणा आणि आडंबराला प्राधान्य दिले जाते, ही वस्तुस्थिती कुणापासूनही लपलेली नाही. अशा पार्श्वभूमीवर उच्चार आणि आचार यांचा संगम घडवून आणत महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाचे अध्यक्ष तथा श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूरचे विश्वस्त ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ यांनी आपल्या चिरंजीव ॲडव्होकेट विशाल जवंजाळ यांचा विवाह अत्यंत साधेपणाने व आदर्श पद्धतीने संपन्न करून समाजापुढे एक अनुकरणीय उदाहरण ठेवले आहे.
कुंभारझरी (ता. जाफराबाद) येथील स्व. चंद्रशेखर लोखंडे यांच्या कन्येसोबत ॲड. विशाल यांचे विवाहस्थळ सुचविण्यात आले. ८ फेब्रुवारी रोजी वधू-वरांची भेट झाली, तर १२ फेब्रुवारीला नवरदेवाकडील मंडळींकडून पाहणीचा कार्यक्रम पार पडला. अवघ्या २५ पाहुण्यांच्या उपस्थितीत कुंकू-टिळा समारंभ पार पडला आणि दुपारी तीन वाजता साध्या पद्धतीने विधी पूर्ण झाले. कोणताही अनाठायी खर्च, दिमाख किंवा दिखावा न करता विवाहसंस्कार पूर्ण करण्यात आले.
या निर्णयामागे अनेक मान्यवरांची प्रेरणा लाभली. राजर्षी छत्रपती शाहू महाराज मल्टीस्टेट बँक, बुलढाण्याचे संस्थापक संदीप दादा शेळके, नागेश्वर संस्थान मूर्तडचे महंत पु. गंजीधर बाबा, ग्रंथालय भारतीचे राष्ट्रीय सचिव सुनील जी वायाळ यांनी आदर्श विवाह संकल्पनेचा आग्रह धरला. तसेच वारकरी धर्मसंकीर्तन मंडळाचे ह.भ.प. सोनूने गुरुजी यांनीही या विचाराला जाहीर पाठिंबा देत तो प्रत्यक्षात आणण्याची प्रेरणा दिली. वधू-वर दोन्ही कुटुंबे वारकरी संप्रदायाचे अनुयायी आणि आदर्श विचारांची पुरस्कर्ते असल्याने हा निर्णय सर्वसंमतीने स्वीकारण्यात आला.
या प्रसंगी भोकरदन विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष पाटील दानवे यांच्या मातोश्री सौ. निर्मलाताई दानवे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. समाजधुरीण, कीर्तनकार, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी या विवाहप्रसंगी हजेरी लावून नवदांपत्याला आशीर्वाद दिले.
आज विवाहसोहळे हे प्रतिष्ठेचे प्रदर्शन बनत चालले असताना जवंजाळ आणि लोखंडे परिवाराने साधेपणा, संयम आणि सामाजिक बांधिलकी यांचा संगम घडवून आणत समाजासमोर नवा आदर्श निर्माण केला आहे. विवाह हा दोन जीवांचा आणि दोन कुटुंबांचा पवित्र संस्कार असून तो आडंबररहित, मूल्याधिष्ठित आणि सामाजिक भान जपणारा असावा, हा संदेश या सोहळ्यातून अधोरेखित झाला. “क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे” या उक्तीचा प्रत्यय देत प्रत्यक्ष कृतीतून दिलेला हा सामाजिक संदेश निश्चितच नव्या पिढीसाठी दिशादर्शक ठरणार आहे.



