शासकीय गोदामात जागा नसल्याने खाजगी गोदामात साठवले जाते स्वस्त धान्य दुकानाचे धान्य. शेगाव येथील परिस्थिती
MH 28 News Live, शेगाव : सरकारी स्वस्त धान्य दुकानातून प्रधानमंत्री अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत रेशन कार्ड धारकांना मोफत वाटप करण्यासाठी जिल्हा पुरवठा विभागाकडून शेगावसाठी पाठवण्यात आलेला धान्यसाठा उतरविण्यात आला आहे. सदर स्वस्त धान्य दुकानातील धान्यसाठा खाजगी मालकीच्या गोडाउनमध्ये उतरवण्यात येत असल्याची माहिती काही पत्रकारांना मिळाली. त्यावरून सदर पत्रकार हे उपरोक्त ठिकाणी गेल्यावर त्या ठिकाणी तो धान्य दुकानातील धान्य असलेले वाहन रिकामे होत असताना आढळून आले. या प्रकारामुळे शासकीय गोदामे कमी पडत असल्याची बाब उघड झाली आहे.
येथील शासकीय गोदामातून स्वस्त धान्य दुकानांमध्ये वाटप करण्यासाठी पुरवठा विभागाद्वारे आलेले गहू तांदूळ मका इत्यादी धान्य पाठवले जाते. हे धान्य टिकवण्यासाठी महसूल विभागाकडून येथील तीन खाजगी मालकीचे गोडाऊन भाडेतत्त्वावर घेतले आहेत. त्या ठिकाणी स्वस्त धान्य दुकानातून वाटप करण्यात येणारा माल साठवला जातो. परंतु, त्याऐवजी खाजगी गोदामात हे धान्य साठवले जात असल्याचे कळताच तेथे पोहचलेल्या पत्रकारांना पाहताच वाहनातून धान्य खाली उतरवणार्या हमालांनी याबाबतची माहिती पुरवठा अधिकारी बोर्डे यांना कळवली. त्यानंतर बोर्डे हे घटनास्थळी आले व त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की शासकीय गोडाऊनमध्ये पाच हजार लोकसंख्येच्या क्षमतेचे धान्य साठविण्याची मर्यादा आहे; त्यामुळे सध्या शहरातील स्वस्त धान्य घेणार्यांची लोकसंख्या 7000 पर्यंत गेली आहे. परिणामी प्रधानमंत्री अन्न सुरक्षा योजनेतील वाटप करण्यासाठी पुरवठा विभागाकडून पाठविण्यात आलेला धान्य साठा करण्यास शासकीय गोदाम कमी पडत आहे म्हणून जिल्हा महसूल विभागाच्या आदेशानुसार शेगाव शहरातील पालडीवाल यांच्या खाजगी मालकीचे दोन गोडावून अधिक एक असे तीन गोडावून शासकीय दरानुसार भाडेतत्त्वावर घेण्यात आले आहेत. येथे उपरोक्त माल साठवण्याचे कार्य सुरू आहे.



