
राजस्थानातील तोतया अभियंत्याने चिखलीतील मुलीशी केले फसवून लग्न. मुलीने दिली सासरच्या 7 जणांविरुद्ध पोलिसांकडे फिर्याद
MH 28 News Live, अभियंता असल्याचे खोटेच सांगून तरुणीशी विवाह उरकणाऱ्या युवकासह सासरच्या ७ जणांविरुद्ध चिखली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
रुचा अश्वनी पांडीया (३२, रा. मेन रोड चिखली) या विवाहितेने या प्रकरणात तक्रार दिली आहे. त्यावरून पती अश्वनी नटवरलाल पांडीया (३४), विनय नटवरलाल पांडीया (३६), श्रीमती रतनकंवर नटवरलाल पांडीया (५५ सर्व रा. पांडीया भवन लक्ष्मी टेंट हाऊस, डेगाना जि. नागौर राजस्थान) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, तिचे लग्न ४ फेब्रुवारी २०१४ रोजी झाले होते.
लग्नावेळी तिला अश्वनी हा अभियंता असून, मंुबईत ब्रिटानिया कंपनीत नोकरीला असल्याचे सांगण्यात आले होते. तसेच तो निर्व्यसनी असल्याचेही सांगितले होते. मात्र लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी तिला कळले की तो कुठेही नोकरी करत नाही. तसेच तो अभियंताही नाही. एवढेच नव्हे तर त्याच्याविरुद्ध चोरी प्रकरणी गुन्हाही दाखल होता व तो जामिनावर होता.
काहीच दिवसांत सासरचे लोक तिचा छळ करू लागले. मारहाण करून घरात कोंडून ठेवू लागले. वडिलांची तब्येत खराब राहत असल्याने रूचा सर्व सहन करत होती. सासरच्यांना मुलगा हवा होता. पण मुलगी झाल्याने छळात वाढ झाली. पैशांची मागणी करून सासरचे लोक छळू लागले. तिला घराबाहेर हाकलून दिले. २९ जानेवारी २०१९ पासून ती माहेरी राहत आहे. कौटुंबिक न्यायालयात समझोता न झाल्याने अखेर चिखली पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.



