
पद्मावती नदीपात्राच्या सफाई व खोलीकरणासाठी जळगाव जामोदमध्ये सुरू झाले बेमुदत उपोषण. आज तिसरा दिवस
MH 28 News Live, जळगाव जामोद : येथून वाहणाऱ्या पद्मावती नदीचे पात्र स्वच्छ करून खोलीकरण करण्यात यावे या मागणीसाठी स्थानिक अमोल मिसाळ, अतुल दंडे, अनिल इंगळे, प्रवीण तायडे व मित्र मंडळ बेमुदत उपोषणास बसले आहेत. दोन वेळ निवेदने देऊनही प्रशासनाने कुठलाच प्रतिसाद न दिल्याने त्यांनी हा मार्ग निवडला आहे.
शहरातून वाहणारी व भिंगारा येथून उगम पावणाऱ्या पद्मावती नदी बाबत नागरिकांमध्ये एक आस्था आहे. या नदीच्या काठी पूर्वीचं जळगाव जामोद शहर वसलेल आहे. मागच्या वर्षी या नदीचे काही प्रमाणात खोलीकरण व संरक्षण भिंतीचे काम झाले होते, परंतु नदीला आलेल्या पुरामुळे जंगलातून विविध प्रकारचे बिया नदीपात्रात संपूर्ण नदीपात्र एरंडी झुडपांनी व्यापल्या गेले आहे. सद्यस्थितीत पावसाळ्याची सुरुवात झाली आहे. अशात मोठा पाऊस आला तर मुख्य प्रवाहाला अडथळा होऊन नदीपात्रातील पाणी मानवी वस्तीत शिरू शकते. हा धोका टाळण्यासाठी नगरपरिषदेने तात्काळ या नदीचे पात्र साफ करून खोलीकरण करावे जेणे करून नदीपात्र योग्य व सुरक्षित राहील तसेच जमिनीत पाणी मुरण्यास मदत होईल. अशा आशयाचे निवेदन यापूर्वी ६ जूनला नंतर १२ जून ला देण्यात आले होते. तरीही संबंधित कार्यालयाने कुठलीही कारवाई न केल्याने निवेदन देणारे नागरिक हे भीमनगर येथील पद्मावती नदीच्या पुलावरच बेमुदत उपोषणासाठी १५ जूनला सकाळपासून बसले आहेत.
उपोषणकर्त्यांची योग्य व न्याय्य मागणी बघता शहरातील इतर नागरिकांमध्ये प्रशासनाविरुध्द नकारात्मक भावना वाढत आहे, त्याच प्रमाणे नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांचे पुरामुळे होणारे नुकसान याची चिंता वाढत आहे. तरी या न्याय्य मागणीला प्रतिसाद देऊन नगरपरिषदेने पहिला मोठा पाऊस होण्यापूर्वी तात्काळ नदी पात्र स्वच्छ करून द्यावे. खोलीकरण सुद्धा करावे ही मागण जोर धरत आहे. एकिकडे प्रशासन नदीकाठावरिल जनतेला पुरापासुन वाचवण्यासाठी महागडया संरक्षक भिंती बांधत आहे. दुसरीकडे नदी पात्रामध्ये अडचण तयार करू त्यात जनतेच्या घरात पाणी जातानाचे चित्र उभे करू पाहत आहे. प्रशासनाच्या या दुटप्पी भूमिकेची नागरिकांमध्ये चर्चा होत आहे.



