
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा यशस्वी करण्यासाठी शिवसैनिकांनी कामास लागावे – संपर्क प्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर यांची जळगाव जामोदमध्ये आवाहन
MH 28 News Live, जळगाव जामोद : येत्या २६ नोव्हेंबर रोजी चिखली येथे आयोजित शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा यशस्वी होण्यासाठी जिल्ह्यातील शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातील शिवसैनिक प्रचंड ताकदीने कामास लागले आहेत. जळगाव जामोद तालुक्यातील शिवसैनिकांनी देखील सर्वशक्तीनिशी या सभेच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न करावे असे आवाहन पक्षाचे संपर्क प्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर यांनी केले आहे. नियोजित सभेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समीती मध्ये रविवारी सकाळी १० वाजता जळगाव जामोद तालुका शिवसेनेची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीला मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी सहसंपर्क प्रमुख दत्ता पाटील, प्रमुख वसंतराव भोजने, युवासेना जिल्हा प्रमुख शुभम पाटील, जिल्हा उपप्रमुख तुकारम काळपांडे, विधानसभा संघटक भीमराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीमध्ये शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची दि. २६ नोव्हेंबर रोजी चिखली येथे जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेचे नियोजन करून पदाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. बैठकीला शिवसेनेचे शहर प्रमुख, उपतालुका प्रमुख, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, बुथ प्रमुख इतर पदाधिकारी किसान सेना, युवासेना, अल्पसंख्याक सेना, वाहतुक सेना व शिवसेनेचे सर्व लोकप्रतिनिधी व शिवसेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.