स्वातंत्र्यवीर सावरकर चौकामध्ये पुतळा उभारण्याची मागणी
MH 28 News Live, चिखली : शहरातील आदर्श विद्यालय मार्गावर असलेल्या श्री उदासीन महाराज मठाला लागूनच स्वातंत्र्यवीर सावरकर चौक आहे. या ठिकाणी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा पुतळा उभारण्यात यावा अशी मागणी जुने गाव परिसरातील रहिवासी व समस्त राष्ट्रप्रेमी नागरिकांच्या वतीने भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष पंडीतराव देशमुख व समर्थ भारत केंद्राचे प्रवर्तक रेणुकादास मुळे यांनी आ. श्वेताताई महाले यांच्याकडे रविवार, दि. ५ मार्च रोजी केली.
भारतीय स्वातंत्र्यलढ्यात क्रांतिकारक म्हणून आणि कालबाह्य रुढी – परंपरांच्या निर्मूलनासाठी कर्ते सुधारक म्हणून स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे अतुलनीय योगदान आहे. भारतमातेच्या अश्या थोर सुपुत्राचा पुतळा चिखली शहरात असेल तर ती सर्वांसाठीच अभिमानाची व प्रेरणादायी बाब ठरेल असे या निवेदनात म्हटले आहे. शहरात आदर्श विद्यालय मार्गावर श्री उदासीन महाराज मठाला लागूनच स्वातंत्र्यवीर सावरकर चौक आहे. योगायोगाची बाब म्हणजे तेथे पाच वर्षांपूर्वी आपल्याच शुभहस्ते स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिमेचे अनावरण करण्यात आले होते. याच ठिकाणी स्वातंत्र्यवीरांचा पुतळा असावा अशी जुने गावातील रहिवाशांसह संपूर्ण शहरातील राष्ट्रप्रेमी नागरिकांची अनेक वर्षांपासूनची इच्छा आहे. शिवाय या ठिकाणी पुतळा उभारल्याने या परिसराच्या सौदर्यीकरणात देखील निश्चितच मोठी भर पडेल. महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुतळा उभारण्यासाठी लागणारी आवश्यक जागा इथे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे या जागेवर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा पुतळा उभारण्यात यावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
या मागणीची तत्परतेने दखल घेऊन स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीदिनी दि. २८ मे २०२३ रोजी सदर पुतळ्याचे अनावरण आपल्याच शुभहस्ते व्हावे ही आमची मागणी आणि अपेक्षा आपण पूर्ण कराल असा विश्वास निवेदनकर्त्यांनी आ. श्वेताताई महाले यांच्या बद्दल व्यक्त केला आहे. या निवेदनातची दखल घेऊन लवकरात लवकर या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पुतळा उभारण्याचे आश्वासन आ. श्वेताताई महाले यांनी यावेळी दिले. भाजपा शहराध्यक्ष पंडीतराव देशमुख, समर्थ भारत केंद्राचे प्रवर्तक रेणुकादास मुळे, प्राचार्य डॉ. किशोर वळसे, माजी नगरसेवक विजय नकवाल या प्रसंगी उपस्थित होते.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button