आंतरराष्ट्रीय खेळाडूंसाठी आर्थिक सहाय्य योजना
MH 28 News Live, बुलडाणा : अधिकृत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी, तसेच सहभागी झालेल्या होतकरु खेळाडूंना प्रशिक्षण आणि इतर बाबींसाठी आर्थिक सहाय्य देण्यात येते. यासाठी खेळाडूंनी प्रस्ताव सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यात क्रीडा संस्कृतीची जोपासना आणि संवर्धन परिणामकारक करण्यासाठी, तसेच राज्यातील खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर दर्जेदार कामगिरी करुन पदक विजेते खेळाडू तयार व्हावेत, यासाठी क्रीडा विषयक तंत्रशुद्ध प्रशिक्षण, खेळाडूंच्या दर्जात सुधारणा, दर्जेदार पायाभूत सुविधा, खेळाडूंचा गौरव, क्रीडा प्रशिक्षकांना अद्यावत तंत्रज्ञानाची ओळख यासाठी क्रीडा धोरण 2012 तयार करण्यात आले आहे. यात राज्यातील खेळाडूंना अधिकृत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आर्थिक सहाय्य देण्यात येते. ही योजना संचालनालय स्तरावर कार्यान्वीत आहे. शासनाच्या निर्णयानुसार अधिकृत आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठीचा प्रवास खर्च, प्रवेश शुल्क, निवास, भोजन, तसेच देश-विदेशातील स्पर्धापूर्व प्रशिक्षण उपकरणे, तज्ज्ञ क्रीडा प्रशिक्षकांचे मार्गदर्शन शुल्क, प्रशिक्षण कार्यक्रम शुल्क, आधुनिक क्रीडा साहित्य आयात किंवा खरेदी करणे, गणवेश आदी बाबींसाठी अर्थसहाय्य दिले जाते.
या योजनेत ऑलिम्पिक गेम्स, विश्व अजिंक्यपद स्पर्धा, एशियन गेम्स, राष्ट्रकुल स्पर्धा, राष्ट्रकुल युवा स्पर्धा, एशियन चॅम्पियनशिप, युथ ऑलिम्पिक, ज्युनिअर विश्व अजिंक्यपद स्पर्धा, शालेय आशियाई, जागतिक स्पर्धा, पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा, पॅरा एशियन स्पर्धा, ज्युनियर एशियन चॅम्पियनशिप, एशियन कप आणि वर्ल्ड कप या स्पर्धांना अधिकृत स्पर्धा म्हणून मान्यता देण्यात आली आहे. ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये ज्या खेळ, क्रीडा प्रकारांचा समावेश असेल तेच खेळ, क्रीडा प्रकार इतर स्पर्धांमध्ये आर्थिक सहाय्य मिळण्यास पात्र आहेत. मात्र कबड्डी, खो-खो, मल्लखांब या देशी खेळांचा अपवाद करण्यात आला आहे.
अधिकृत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी किंवा सहभागी झालेल्या खेळाडूंनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज परिपूर्ण भरुन देणे आवश्यक आहे. संपूर्ण कागदपत्रांसह संबंधित जिल्ह्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत किंवा आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे यांच्याकडे सादर करावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button