
चिखली एमआयडीसीमधील नागवाणी इंडस्ट्रीजला भीषण आग; सुमारे १५ लाखांचे नुकसान
MH 28 News Live / चिखली : चिखली एमआयडीसी परिसरातील चेतन नागवाणी यांच्या मालकीच्या नागवाणी इंडस्ट्रीज या पत्रावळी व द्रोण निर्मिती कंपनीला 21 मे रोजी मध्यरात्री भीषण आग लागण्याची दुर्दैवी घटना घडली. या आगीत कंपनीतील अंदाजे १२ ते १५ लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाले.
आगीची माहिती मिळताच चिखली आणि बुलढाणा नगरपरिषदेच्या अग्निशमन दलांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आग विझवण्यासाठी प्रवीण जाधव, राहुल गवळी, पांडुरंग सोळंकी, तुषार गवई, शेख इस्माईल, अनुप खरे, सागर गवळी व इतर जवानांनी अथक प्रयत्न केले. त्यांच्या मेहनतीमुळे आग नियंत्रणात आली, मात्र तोपर्यंत मोठे आर्थिक नुकसान झाले होते.
आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, संबंधित विभागाकडून यासंबंधी तपास सुरू आहे. औद्योगिक क्षेत्रासाठी ही घटना मोठा धक्का मानली जात आहे.