
अमृत’ संस्थेच्या प्रशिक्षण, अर्थसहाय्य योजनेचा खुल्या प्रवर्गातील युवकयुवतींनी योजनांचा लाभ घ्यावा – विशेष कार्य अधिकारी सिद्धेश्वर वरणगावकर यांचे आवाहन स्पर्धा परीक्षार्थींना मिळते अर्थसहाय्य
MH 28 News Live / बुलढाणा : राज्य शासनाची महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात ‘अमृत’ संस्था व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने बुलढाणा जिल्ह्यातून खुल्या गटातील लाभार्थ्यांचा सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने अमृत संस्थेचे विशेष कार्य अधिकारी सिद्धेश्वर वरणगावकर यांनी नुकतीच जिल्हाधिकारी डॅा. किरण पाटील यांची भेट घेतली. जिल्ह्यातील अधिकाधिक युवक-युवतींनी अमृत संस्थेच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन सिद्धेश्वर वरणगावकर यांनी यावेळी केले.
यावेळी बुलढाणा जिल्हा व्यवस्थापक जिग्नेश कमाणी व मेहकर येथील नंदकिशोर मगर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्ह्यातील उद्योजकतेलाही चालना देण्याचा सकारात्मक विचार व्यक्त करण्यात आला. यावेळी त्यांनी प्र. जिल्हा माहिती अधिकारी पवन राठोड यांचीही भेट घेवून योजनांची पुस्तिका भेट दिली.
योजना कोणत्या आहेत ?
रोजगारक्षम कौशल्य विकासासाठी स्वयंरोजगार प्रशिक्षण योजना, कृषी उद्योग प्रशिक्षण योजना, ड्रोन ॲापरेटर रिमोट पायलट प्रशिक्षण योजना, आर्थिक साक्षरता प्रशिक्षण योजना आणि अमृत बेकरी प्रशिक्षण योजना राबविण्यात येत आहेत.
औद्योगिक व उन्नत कौशल्य विकासासाठी तांत्रिक रोजगार प्रशिक्षण, माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॅानिक्स तथा उच्च कार्यक्षमता संगणक प्रशिक्षण, व्यवसाय किंवा उद्योग इंक्युबेशन योजना, अमृत कलश योजना राबविल्या जात आहेत.
स्पर्धा परीक्षा प्रोत्साहन
अर्थसहाय्यासाठी युपीएससी स्पर्धा परीक्षा नागरी सेवा/ वन सेवा/ अभियांत्रिकी सेवा परिक्षार्थींना अर्थसहाय्य दिले जाते.तसेच एमपीएससी स्पर्धा परीक्षा गट अ,ब च्या परीक्षार्थींना अर्थसहाय्य दिले जाते.
उद्योजकांकरिता आर्थिक विकास
या योजनेंतर्गत वैयक्तिक व्याज परतावा योजना आणि परशुराम गट व्याज परतावा योजना राबविली जात आहे. शैक्षणिक अर्थयहाय्य योजनेंतर्गत एम्स, आयआयटी, आयआयएम, आयआयआयटी या संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य आणि शासकीय संगणक टंकलेखन व लघुलेखन परीक्षेसाठी अर्थसहाय्य दिले जात आहे.
व्यक्तिमत्व विकासांतर्गत किशोर विकास उपक्रम व अमृत कलश योजना राबविली जात आहे. बुलढाण्यातील युवकयुवतींनी अमृत संस्थेच्या योजना व प्रशिक्षणाच्या अधिक माहितीसाठी जिग्नेश क्रमाणी यांना 8308998922 मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अमृत योजनेच्या या महत्त्वाकांक्षी योजनांची जिल्ह्यातील खुल्या प्रवर्गातील युवकयुवतींनी अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन अमृत संस्थेचे विशेष कार्य अधिकारी सिद्धेश्वर वरणगावकर यांनी केले आहे.